होमपेज › Nashik › एसटीच्या तिकीट बुकिंगसाठी आता खासगी एजंट

एसटीच्या तिकीट बुकिंगसाठी आता खासगी एजंट

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:54PMनाशिक : प्रतिनिधी

रेल्वेच्या धर्तीवर एसटी महामंडळ देखील आता राज्यभर तिकीट विक्री व आरक्षणासाठी खासगी एजंट नेमणार आहे. तोट्यात असलेल्या एसटीचे या माध्यमातून उत्पन्‍न वाढावे, हा त्या मागचा प्रमुख उद्देश आहे. एजंटने जर पाच लाख रुपयांचा व्यवसाय दिला तर त्यास एसटी महामंडळ चार टक्के घसघशीत कमिशन देईल. 70 वा वर्धापन दिन साजरा करताना एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
खासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने कात टाकली असून, वातानुकूलित शिवशाही बसचा ताफा सेवेत समाविष्ट केला आहे.

त्याच बरोबर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदींसह विविध शहरामंध्ये एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये एसटी बससेवा व बसस्थानकांचा चेहरामोहरा बदललेला दिसणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांची संख्या वाढावी याकडे देखील एसटी महामंडळाने आता लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने रेल्वेच्या धर्तीवर राज्यभरात खासगी एजंट नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार, विविध शहरांमध्ये एसटी एजंट नेमणार आहे. त्या अंतर्गत एजंट म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांना महामंडळाकडे 50 हजार रुपये डिपॉझिट व पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरावे लागेल.

एजंटकडे संगणक अथवा लॅपटॉप, इंटरनेट व कार्यालय ही सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक राहील. यापूर्वी तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना बसस्थानकात जावे लागायचे. आता मात्र, एजंटशी फोनवर अथवा त्याच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधून तिकीट आरक्षित करू शकतात किंवा एजंटकडून तिकीट खरेदी करू शकतात. एजंटने जर पाच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा गाठला तर त्यास एसटी महामंडळ चार टक्के कमिशन देईल. तसेच, पाच लाखांच्या पुढे जसे उत्पन्न वाढेल तसे एजंटच्या कमिशनमध्ये वाढ केली जाईल. एजंटच्या माध्यमातून एसटी प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सेवा व सुविधांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटी महामंडळ करणार आहे.