Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Nashik › धुळ्यात कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन

धुळ्यात कैद्यांचे अन्नत्याग आंदोलन

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:25PMधुळे : प्रतिनिधी

नाशिककडून धुळ्याकडे येताना लळिंग घाटामध्ये पोलीस व्हॅनमध्ये धिंगाणा घालून पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप असणार्‍या बंद्यांनी शनिवारी अन्नत्याग आंदोलन केले. या बंद्यांची कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी समजूत काढली असली तरीही बंद्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. धुळे कारागृहात राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील 18 ते 23 वर्षे वयाच्या शिक्षा बंदींना ठेवण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी यातील 16 जणांना पैठण येथील खुल्या कारागृहातील प्रवेशासाठी नाशिक कारागृहातील समितीसमोर हजर करण्यात आले. तेथून परत येत असताना धुळे शहरालगत लळिंग घाटात गाडीतील काही कैद्यांनी पोलीस पथकास बाहेर हॉटेलमधून चिकन आणि बिर्यानी घेऊन देण्याची मागणी केली.

मात्र, ही मागणी फेटाळल्याने या गाडीत बंद्यांमध्ये हाणामारी झाली. यात पोलिसांनादेखील मारहाण झाली. या प्रकरणात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आज अचानक यातील काही कैद्यांनी धुळे कारागृहात दुपारचे जेवण घेण्यास नकार देत कारागृहाबाहेर आले. या बंद्यांंनी सरसकट सर्वच बंद्यांवर  गुन्हे दाखल करण्यास विरोध केला आहे. गाडीतील मोजक्या बंद्यांंनी हा प्रकार केलेला असताना सर्वच बंद्यांवर गुन्हा दाखल झाल्याने अन्याय झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी मात्र बंद्यांनी अन्नत्याग केला नसल्याचे सांगून सर्वांनी दुपारचे जेवण घेतल्याचा दावा केला आहे. तसेच बंद्यांची भावना पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.

 

Tags : Dhule, Dhule news, Prisoners, food sacrificing movement,