Sun, May 26, 2019 09:28होमपेज › Nashik › खळबळजनक; बिर्याणीसाठी कैद्यांचा पोलिसांवरच हल्ला

खळबळजनक; बिर्याणीसाठी कैद्यांचा पोलिसांवरच हल्ला

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 9:57AMधुळे : प्रतिनिधी

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून धुळे कारागृहात नेले जात असताना 16 शिक्षाबंदी कैद्यांनी चिकन बिर्याणीची मागणी करीत कैदी पार्टीतील पोलिसांना व इतर कैद्यांना मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 16 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणार्‍या 16 कैद्यांना कैदी पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक गोरख मन्साराम शिरसाठ त्यांच्या सहकार्‍यांसह नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहातून धुळे कारागृहात हजर करण्यासाठी व्हॅनमधून (एमएच 18 जी 0174) घेऊन जात होते. बुधवारी (दि.18) पहाटेच्या सुमारास धुळे शहरालगतच्या लळिंग घाटात वाहन आल्यानंतर कैद्यांनी पोलिसांना शिवीगाळ करीत पत्र्यांचा आवाज करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कैद्यांना विचारणा केली असता, त्यांनी पोलिसांकडे जेवणासाठी चिकन बिर्यानी द्या, अशी मागणी केली.

त्यास पोलिसांनी नकार देताच काही कैद्यांनी वाहनात स्वत:चे डोके फोडून न्यायाधीशांकडे पोलिसांनी मारहाण केल्याची खोटी तक्रार करू, अशी धमकी पोलिसांना दिली. पोलिसांनी या धमकीकडेही दुर्लक्ष करीत कैद्यांना दाद दिली नाही. त्यामुळे काही कैद्यांनी वाहनातील लोखंडी रॉडवर डोके आपटण्यास आणि एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, कैद्यांनी बेडीने पोलिसांनाच बेदम मारहाण केली. 

या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार या सर्व कैद्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व कैदी मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्राच्या विविध शहरांमधील आहेत.