Tue, Jun 25, 2019 15:09होमपेज › Nashik › कांदा हमीभावासाठी पंतप्रधानांना साकडे

कांदा हमीभावासाठी पंतप्रधानांना साकडे

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:09AM
नाशिक : प्रतिनिधी

शेती व्यवसायाबाबत केंद्र शासन धोरण जाहीर करणार असल्याचे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिष्टमंडळाला दिले. गोडसे यांच्या नेतृत्वाखाली भेटीस गेलेल्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे कांद्याला हमीभाव देण्याचे साकडे घालत निवेदन सादर केले. 

याप्रसंगी शिवाजी निमसे, शिरीष लवटे, नितीन चिडे, राजेश फोकणे, संजय करंजकर, नितीन खर्जुल, सुरेश सहाणे, संजय माळोदे, शंकर निमसे, शांताराम माळोदे, शिवजी पटेल, कृष्णा लवटे, मिलिंद माळवे, सचिन कोठुळे, कैलास मालुंजकर आदींनी खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी नाशिक जिल्ह्यातील ऊस, कांदा, द्राक्ष, गहू, भाजीपाला या शेती पिकांविषयी चर्चा केली.

दोन वर्षांपासून कांद्याचे उत्पादन चांगले आहे. मात्र, उत्पादन खर्च वाढल्याने शेतकर्‍यांना त्याप्रमाणात भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगण्यात आले. शेतकरी हिताच्या दृष्टीने नवीन धोरण आखण्यात येईल. त्यात जिरायती व बागायती शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधे, पाणी, वीज व शेती अवजारे, यंत्र पुरविणे याकामी धोरणात समावेश असेल. तसेच नाशिक येथील कांदा या नगदी पिकाबाबत केंद्र शासनामार्फत हमीभाव देण्याचा विचार केला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.