Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Nashik › लेखाधिकार्‍यांवर कामासाठी दबाव

लेखाधिकार्‍यांवर कामासाठी दबाव

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:14PMनाशिक : प्रतिनिधी

लेखा व कोषागार विभागातून प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकार्‍यांना दबावात काम करावे लागते. अनेकदा हे संबंधित विभागातील अधिकारी व पदाधिकार्‍यांकडून हे वाद प्रतिष्ठेचे केले जात असल्याने ते विकोपाला पोहोचतात. परिणामी लेखाधिकार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा गौप्यस्फोट लेखा व कोषागार विभागाचे संचालक ज. र. मेनन यांनी केले.

महाराष्ट्र वित्त व लेखा कोषगार विभागाच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मेनन यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. या दौर्‍यातील नाशिक विभागाची पहिली बैठक रविवारी (दि.21) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये पार पडली. त्याप्रसंगी मेनन बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळाचे संचालक सु. ल. पिंपळखुटे, लेखा व कोषगार सहसंचालक बाळासाहेब घोरपडे, सहायक लेखा व कोषगार अधिकारी स्वरांजली पिंगळे, संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष रमेश शिसव आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर शासकीय विभागांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या लेखाधिकार्‍यांना चांगल्या वातावरणात काम करता यावे ही आग्रही मागणी आहे. त्यासाठी संबंधित विभाग, तेथील पदाधिकारी व लेखाधिकार्‍यांमध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मेनन यांनी सांगितले. शासनाच्या प्रत्येक विभागाशी आर्थिक लेखापरीक्षणामुळे  लेखा व कोषागार विभागाशी संपर्क येत असतोे. त्यामुळे प्रत्येक विभागातील खर्चाचा तपशील विभागाकडे आहे. या तपशीलाचे विश्‍लेषण करून सरकारला विभागनिहाय वित्तीय नियोजनबाबत मार्गदर्शन  करण्याचा मानस मेनन यांनी व्यक्त केला.

शासनाचा मुख्यत्वे विभाग असूनही लेखा व कोषागार विभागातील एक हजार पदे रिक्त आहेत. वाढत्या कामाचा तणाव बघता 30 टक्के कपातीच्या निर्णयातून विभागाला वगळण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे मेनन यांनी सांगितले. कोषगारातील पदोन्नतीसह अनेक प्रश्‍न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न असेल, असे मेनन यांनी सांगितले. यावेळी पिंपळखुटे यांनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेतर्फे शाल, स्मृतिचन्ह व गुलाबपुष्प देऊन मेनन व पिंपळखुटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंडित गवळी, राजेश लांडे, बाबूराव निर्मळ, राजाभाऊ राजवाडे यांच्यासह विभागातील तसेच पुणे, मुंबई आणि कोकण येथून आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.