Mon, May 25, 2020 23:47होमपेज › Nashik › राष्ट्रपती कोविंद नाशिकला दाखल (video)

राष्ट्रपती कोविंद नाशिकला दाखल (video)

Last Updated: Oct 10 2019 1:40AM
नाशिक : प्रतिनिधी 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सपत्नीक दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यासाठी वायुदलाच्या विशेष विमानाने बुधवारी (दि.9) सायंकाळी   ओझर येथील विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांचा व्हीव्हीआयपी ताफा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाला.

ओझरच्या विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. राष्ट्रपतींसमवेत 40 अधिकारी-कर्मचार्‍यांचा ताफा आहे. राष्ट्रपती दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दौर्‍यापूर्वी मंगळवारी संपूर्ण मार्गावर बॉम्बशोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. या परिसरात अन्य वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. गडकरी चौकाकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाकडे वळविण्यात आली होती.  राष्ट्रपतींचा व्हीव्हीआयपी ताफा शासकीय विश्रामगृहावरून गुरुवारी (दि.10) गांधीनगरकडे रवाना होईल. कॅट्सच्या मैदानावर एव्हिएशनच्या वैमानिकांचा गौरव करत राष्ट्रपती कोविंद हे मार्गदर्शन करणार आहेत. एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धुनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तिन्ही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती कोविंद यांना मानवंदना देणार आहेत.