होमपेज › Nashik › हजयात्रा महागली, जीएसटीचा फटका बसणार

हजयात्रा महागली, जीएसटीचा फटका बसणार

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 02 2018 11:06PMजुने नाशिक : खान नजमुल इस्लाम  

हजयात्रेची तयारी भारतीय हज कमेटी बैत-उल-हुजाजतर्फे पूर्ण झाली असून,  देशभरातील सुमारे दोन लाख यात्रेकरू सौदी अरेबियाच्या पवित्र मक्‍का शरीफ येथे विमानाने टप्प्याटप्प्याने पोहोचत आहेत. 12 ऑगस्टला शेवटचे उड्डाण भरले जाईल. यंदाची हजयात्रा 18 टक्के जीएसटीमुळे महागली आहे. तर सौदी अरेबियानेदेखील पाच टक्के व्हॅट कर आकारत त्यात भर टाकली आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे 12 हजार हजयात्रेकरू यंदा हजयात्रेला जात आहेत, अशी माहिती खादीमुल हुज्जाज कमेटीचे हज प्रशिक्षक शेख जहिर यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिली.

हजयात्रेला जाण्यासाठी अजिजा व ग्रीन अशा दोन वर्गांत प्रवास करता येतो. अजिजा व ग्रीन वर्गातील हजयात्रेकरूंना  प्रवास खर्च सुमारे दोन लाख  रुपये, तर खासगी टूर्स ट्रॅव्हलसतर्फे यापेक्षा अधिक प्रवास खर्च आकारला जातो. सर्वोच्च न्यायायालयाच्या आदेशामुळे सरकारकडून अनुदान (सबसिडी) बंद करण्यात आले आहे. अनुदान बंदच्या निर्णयाचेे मुस्लिम समाजाकडून  स्वागत  झाले आहे.  अनुदानामुळे विमान प्रवासभाडे अव्वाच्या सव्वा आकारले जात होते. यात्रेला जाण्यासाठी सध्या नागपूर, औरंगाबाद व मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जाण्याची सोय आहे.  मात्र, बहुतांश हजयात्रेकरू मुंबई येथील विमानतळाला पसंती देत आहेत. ओझर विमानतळावरून  किमान हजच्या काळात तरी जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी धूळ खात पडून आहे.

फक्‍त एकदाच हजला जाण्याची संधी

इस्लाम धर्म ज्या पाच मूलतत्त्वांवर आधारित आहे त्यापैकी एक हज होय. हजयात्रेचा खर्च करण्याची ऐपत बाळगणारा जीवनातून एकदा पवित्र मक्‍का शरीफ येथे हजयात्रेला जाणे धर्माने अनिवार्य केले असल्याने दरवर्षी  जगभरातून लाखो यात्रेकरू हजला जातात. जगभरातील  विविध भाषिक, वर्णभेद असलेले लाखो मुस्लिम खांद्याला खांदा लावून एका वेशभूषेत (ऐहराम) हजचे विधी पार पाडतात हे विशेष. पूर्वी किती वेळाही हजयात्रेला जाता येत असत. श्रीमंत व धनिक मुस्लिम वारंवार हजयात्रा करीत असत. त्यामुळे इतरांना हजयात्रेला जाण्याचे अडचणीचे ठरत असत. यामुळे ते हजयात्रेपासून वंचित राहत. त्यामुळे आता नवीन नियमानुसार आता दुसर्‍यांदा हजयात्रेला जाण्याची मुभा नाही. या नवीन नियमामुळे अनेकांना हजयात्रेची संधी मिळत आहे.