होमपेज › Nashik › नाशिकमध्ये आता धावणार प्रीपेड टॅक्सी

नाशिकमध्ये आता धावणार प्रीपेड टॅक्सी

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 11:28PMनाशिक : प्रतिनिधी

प्रीपेड रिक्षा सेवा झाल्यानंतर आता शहरातून प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली असून, भारतरत्न मागासवर्गीय सहकारी ग्राहक संस्थेला हे काम देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात सेवा सुरू होणार असल्याची माहिती संस्थेने दिली. 

यापूर्वी शहरात प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. पण, ही सेवा यशस्वी होऊ शकली नव्हती. शेअर ऑटो हे प्रमुख कारण त्यामागे सांगितले जात होतेे. त्यानंतर आता शहरातून जिल्ह्याच्या विविध भागांत तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठीही प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न मागासवर्गीय सहकारी ग्राहक संस्थेमार्फत ही सेवा दिली जाणार असून, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या 21 डिसेंबर 2017 ला झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार संबंधित संस्थेला नुकतेच आदेश देण्यात आले आहेत. 

विशेष म्हणजे ही सेवा ग्राहकांना परवडणारी आहे. त्र्यंबकेश्‍वरला जाण्यासाठी सद्यस्थितीत आकारले जाणारे भाडे 800 रुपये असून, प्रीपेड टॅक्सीने हेच भाडे 725 रुपये आहेत. दोन्ही बाजूचे भाडे 1,329 रुपये आहे. शिर्डीसाठी आकारल्या जाणार्‍या भाड्यात मात्र वाढ होणार आहे. सध्याचे भाडे 1,500 रुपये असून, प्रीपेड टॅक्सीने हेच भाडे एका बाजूने 1,810 रुपये तर दोन्ही बाजूने 3,319 रुपये राहणार आहे.

याशिवाय मनमाडसाठी दोन्ही बाजूने 3,240 रुपये तर एका बाजूने 1,500 रुपये भाडे राहणार आहे. तसेच शनिशिंगणापूरला जाण्यासाठी एका बाजूने 2,770 रुपये मोजावे लागणार आहे. दोन्ही बाजूचे भाडे 5,080  रुपये इतके राहणार आहे. सापुतारा येथे जाण्यासाठी 1,650 रुपये एका बाजूने तर 3,026 रुपये दोन्ही बाजूने असा भाडे दर प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान, लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.