Mon, Jul 22, 2019 05:00होमपेज › Nashik › नाशिकमध्ये मान्सूनपूर्वच्या सरी

नाशिकमध्ये मान्सूनपूर्वच्या सरी

Published On: Jun 03 2018 1:17AM | Last Updated: Jun 02 2018 11:00PMनाशिक : प्रतिनिधी

सलग दुसर्‍या दिवशी मान्सूनपूर्वच्या सरींनी जिल्ह्यात हजेरी लावली. नाशिक शहराला शनिवारी (दि.2) सायंकाळच्या सुमारास अर्धा तास पावसाने झोडपून काढले. पहिल्याच पावसात नाशिककर चिंब भिजले. दरम्यान, निफाडमध्ये वीज अंगावर पडल्याने एक गाय गतप्राण झाली. तर मालेगाव व निफाडमध्ये विजेचे खांब आणि घरांची पडझड झाली. गत 24 तासांमध्ये जिल्ह्यात 1.46 मिमी पावसाची नोंद झाली.

नाशिक शहरात शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान, अचानक वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व सरींमुळे गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे घामाघूम झालेल्या सर्वसामान्यांना या पावसाने दिलासा दिला. दुसरीकडे मात्र सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील विविध भागांत पाणी तुंबल्याचे प्रकार घडले. अचानक आलेल्या पावसाने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह विक्रेत्यांची धावपळ उडाली. तर कार्यालयांमधून घरी परतणारे चाकरमानी पावस ात अडकून पडले. पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागांतील बत्ती गूल झाली. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. 

लासलगावमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. सोनगाव येथील शेतकरी शिवनाथ गावले यांच्या गायीच्या अंगावर वीज पडून ती जागीच गतप्राण झाली. मालेगावमधील दुंडेत काही घरांची पडझड झाली. तसेच विजेचे चार खांब पडले. कांदाचाळी व डाळिंबाच्या बागांना या पावसाने फटका बसला.