Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Nashik › बेगानी शादी में धर्मादाय आयुक्‍त दीवाना...

बेगानी शादी में धर्मादाय आयुक्‍त दीवाना...

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:13AMनाशिक : प्रतिनिधी

गरीब शेतकर्‍यांच्या मुलींचे विवाह लावण्यासाठी राज्याच्या धर्मादाय आयुक्‍तांनी घेतलेला पुढाकार तज्ज्ञांनी प्रश्‍न उपस्थित केल्याने वादात सापडला आहे. या विवाह सोहळ्यांच्या निधी संकलनासाठी राज्यभर नेमलेल्या समित्यांवर धर्मदाय आयुक्‍तांकडे खटले सुरू असलेले  पक्षकारही नेमले गेले असून, सामुदायिक विवाहांसाठी मदत करणार्‍या दानशूरांमध्ये आयुक्‍तांसमोर खटले सुरू असलेल्या वादग्रस्त संस्थांचाही समावेश असणार आहे. 

आर्थिक हलाखीमुळे मुलींचे विवाह लावण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे वृत्त वाचून धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून राज्यातील सार्वजनिक विश्‍वस्त संस्थांकडून निधी जमवून गरीब शेतकर्‍यांच्या मुलींचे सामूहिक विवाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी धर्मादाय सहआयुक्‍तांकडून बैठका घेण्यात आल्या.  या निर्णयाविषयी सर्व संस्थांना कळवण्यात आले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापनाही करण्यात आली. 

या सामुदायिक विवाहांसाठी सार्वजनिक संस्थांकडून निधी जमा केला जाणार आहे. त्यासाठी रीतसर बँक खाते उघडण्यात आले असून, प्रत्येक रुपयाचा हिशेब ठेवला जाणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. इथेच साधनशुचितेचा प्रश्‍न उपस्थित झाला आणि नियमांचाही. शेतकर्‍यांच्या मुलींच्या विवाहांसाठी जे मदत करतील त्यात दानशूरांमध्ये धर्मादाय आयुक्‍तांकडे दावे सुरू असलेल्या वादग्रस्त संस्थांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे, धर्मादाय आयुक्‍तालयात खटले सुरू असलेल्या व्यक्‍तींना या सोहळ्याशी संबंधित समित्यांवरही स्थान देण्यात आल्याने तर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निधी देवाण घेवाणीतून धर्मादाय आयुक्‍तालयावर वा त्यांच्या निर्णयावर दबाव आणला जाण्याची, परिणाम घडवून आणली जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे. 

सार्वजनिक विश्‍वस्त संस्थांची नोंदणी, त्यांच्यावर नियंत्रण, नियमन राखणे, त्यांच्या दाव्यांची सुनावणी करणे आदी मूळ कामांपलीकडे जाऊन धर्मादाय आयुक्‍तालयाला अशा सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेता येतो का, विश्‍वस्त संस्थांच्या बैठका घेण्यापूर्वी यासंदर्भात शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे का, अशी विचारणा होत आहे. धर्मादाय आयुक्‍तालयाच्या संकेतस्थळावर या निर्णयाचा अवाक्षरानेही उल्लेख करण्यात आलेला नाही.  नाशिकमध्ये या उपक्रमांतर्गत येत्या 17 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे.