Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Nashik › विधान परिषदेसाठी आज मतदान

विधान परिषदेसाठी आज मतदान

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 12:12AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानास प्रारंभ होणार असून, 644 मतदार आपल्या मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे व अपक्ष परवेझ कोकणी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. जिल्ह्यात मतदानासाठी 15 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. नाशिकमधील केंद्र हे जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित 14 मतदान केंद्रे ही त्या-त्या तालुक्यांच्या तहसील कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान होणार आहे.

मतपत्रिकेद्वारे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षांसह सहा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सहाणे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील व आ. बाळासाहेब थोरात यांनी सभा घेतल्या. तर दराडेंच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः नाशिकमध्ये येऊन पक्ष सदस्यांची बैठक घेतली. दरम्यान, अपक्ष परवेझ कोकणी यांनीही त्यांच्या विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत भरली आहे. अखेरच्या टप्प्यात उमेदवारांनी व पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी मतदारांच्या वैयक्‍तिक गाठीभेटींवर भर दिला आहे.

दरम्यान, सोमवारी मतदान पार पडल्यानंतर गुरुवारी (दि. 24) सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल. जिल्ह्यात एकीकडे निवडणूक ऐन रंगात असताना कळवण पंचायत समितीच्या सभापती आशाबाई पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांना मतदान करू द्यायचे की नाही यावरून प्रशासनासमोर पेचप्रसंग निर्माण झाला होता. या परिस्थितीवर प्रशासनाने आयोगाकडून मार्गदर्शन मागविले होते. दरम्यान, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यावेळी पवार या पदावर होत्या. त्यामुळे पवार यांना मतदानात सहभागी होता येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.