Thu, Jul 18, 2019 08:54होमपेज › Nashik › राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही : छोरींग दोर्जे 

राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही : छोरींग दोर्जे 

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 10:52PMधुळे : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये राजकीय दडपणाने नेमणूका होणे अयोग्य असून, पोलीस ठाण्यात कोणत्याही कामात राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिला आहे. धुळे जिल्ह्यात पोलीस महानिरीक्षक दोर्जे सोमवारी तपासणीसाठी दौरा केला यावेळी त्यांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली. 

नाशिक परिक्षेत्रात नेमणूक झाल्यानंतर साक्री तालुक्यात राईनपाडा गावात हत्याकांड घडले. यावेळी त्यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी करीत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. याचवेळी ते धुळ्यात गुन्हे आणि अन्य कामांचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने तयारी केली होती. पण दोर्जे हे साक्रीमधून परस्पर नाशिक येथे गेलेे होते. सोमवारी जिल्हा पोलीस दलास कोणतीही सूचना न देेता अचानक ते सकाळी 11 वाजेच्या सुमारास धुळ्यात दाखल झाले. त्यामुळे पोलीस अधिकार्‍यांची धावपळ उडाली.

यावेळी पोलीस महानिरीक्षक दोर्जे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांमध्ये जावून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. विशेषत: पोेलीस नियंत्रण कक्षात जाऊन त्यांनी नोंदींची तपासणी केली. यानंतर चिंतन सभागृहात दुपारी 12 वाजेपासून आढावा बैठकीस सुरूवात केली. ही बैठक तब्बल 6 तास चालली. बैठकीत धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्ह्यांंची माहिती घेेतली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील नेमणूका राजकीय प्रभावाखाली करू नये, असे सुनावले. तसेच, पोलीस ठाण्याच्या कामकाजात आता कोेणताही राजकीय हस्तक्षेप झाल्याचे निदर्शनास येताच आपण संबंधिताला सोडणार नाही, असा इशाराही दिला.

जिल्हा अवैध धंदेमुक्त हवा

जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा अवैध धंदा खपवून घेणार नाही, यासाठी प्रत्येेक अधिकार्‍याने त्यांच्या हद्दीमधील अवैध व्यवसायावर कारवाई केली पाहिजे. तसेच, आपणास काही आढळून आल्यास थेट कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अधिकार्‍यांंनी जनतेबरोबर सुसंवाद साधावा. तक्रार घेवून आलेल्या प्रत्येकाचे शंका-समाधान केले पाहिजे असे सांगितले.