Tue, Mar 26, 2019 08:01होमपेज › Nashik › नाशिक परिक्षेत्रातील पोलीस बदल्या रखडल्या

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस बदल्या रखडल्या

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 10:45PMओझर : मनोज कावळे

नासिक परिक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षकांपासून तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंत सर्व अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या आहेत. यामुळे  पोलीस अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तसेच पोलीस पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍नही  यामुळे ऐरणीवर आला आहे.

पोलीस दलात साधारणपणे मार्चअखेरपासून कर्मचार्‍यांचा बदली कालावधी सुरू होतो. यात कर्मचार्‍यांना एका पोलीस स्टेशनला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. तर उपनिरीक्षकापासून वरिष्ठ निरीक्षकांना परिक्षेत्रात सहा वर्षे एका जिल्ह्यात चार वर्षे, तर एका पोलीस स्टेशनला दोन वर्षांचा कालावधी मिळतो. यावर्षी पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या याच नियमानुसार झाल्या. परंतु कोणतेही सबळ कारण नसताना केवळ  सरकारी अनास्थेमुळे अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या आहेत.

यापूर्वीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याच काळात या बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु विनयकुमार चौबे यांचीच बदली झाल्याने त्यांनीच जाणीवपूर्वक  या बदल्या टाळल्याची चर्चा सध्या अधिकारी वर्गात होत आहे. त्यातच महाराष्ट्रा—त इतर परिक्षेत्राच्या बदल्या यापूर्वीच झाल्या. नाशिक परिक्षेत्रातल्या बदल्यांसाठी शिक्षक मतदारसंघाचे कारण पुढे केले गेल्याचेही सूत्रांनी सांगितले. सध्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी उशिरा कार्यभार घेतला. त्यामुळे प्रारंभीच रखडलेल्या बदल्यांना आणखी  उशीर होत आहे. त्यातच या अधिकार्‍यांच्या मुलांचे शैक्षणिक वर्षदेखील धोक्यात आल्याने त्यांचा शिक्षणाचा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे. बदलीचा कालावधी उलटून  जात असल्याने त्यातच ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया संपत आल्याने अनेक अधिकार्‍यांच्या पाल्यांनी आहे त्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे. मात्र, मध्येच बदली झाली तर काय करायचे, असा यक्ष प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. 

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या निर्णयाकडे लक्ष

अशा द्विधा मनस्थितीत अधिकारी आणि त्यांचे पाल्य यांची सध्या अवस्था झाली आहे. अधिकार्‍यांना जूनपर्यंत बदल्यांच्या यादीची अपेक्षा होती. परंतु जुलैचा पंधरवडा उलटला, तरी यादी प्रसिद्ध होत नसल्याने उच्च शिक्षण घेणार्‍या तसेच ऑनलाइन प्रवेश घेतलेल्या  पाल्यांना आता बदली झाली तर करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. अधिकार्‍यांच्या या बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दार्जे यांच्या नियंत्रणाखाली असल्याने आता त्यांचे लक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या निर्णयाकडे लागून आहे.