Wed, Feb 20, 2019 19:06होमपेज › Nashik › पोलीस संरक्षणात होणार शेतमाल विक्री

पोलीस संरक्षणात होणार शेतमाल विक्री

Published On: Jun 04 2018 1:06AM | Last Updated: Jun 03 2018 10:43PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक बाजार समितीत रविवारी (दि.3) सुट्टीच्या दिवशीही शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी आणला. ग्रामीण भागात सुट्टी व संपाच्या पार्श्‍वभूमीवर मालाची आवक कमी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून (दि. 4) बाजार समित्यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, शेतकर्‍यांनी माल विक्रीस आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमाल व दुधाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासभेने देशभर संपाची हाक दिली आहे. या संपाचे काही प्रमाणात पडसाद नाशिकमध्येही उमटले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील 17 ही बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेत घट झाली आहे. दुसरीकडे दूध संकलनावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, रविवारी सुट्टी असल्यानेशेतकरी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणणार नाही, अशी अटकळ होती. परंतु, जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नाशिक बाजार समितीत उलटे चित्र पहावयास मिळाले. गत दोन दिवसांपासून शुकशुकाट असलेल्या समितीच्या आवारात रविवारी शेतकर्‍यांनी त्यांचा माल विक्रीसाठी आणला होता. मात्र, ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक घटली होती. 

..तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा : जिल्ह्यातील सतरा बाजार समित्यांचे सोमवारपासून (दि. 4) पोलीस संरक्षणात नियमित कामकाज सुरू होणार आहे. शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शेतमाल आणण्यासाठी कोणी विरोध करत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे. संबंधितांना तत्काळ पोलीस संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल, असेही खेडकर यांनी स्पष्ट केले आहे.