Mon, Jun 24, 2019 16:51होमपेज › Nashik › रानडुक्‍कर शिकार प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी

रानडुक्‍कर शिकार प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:52PMकळवण : वार्ताहर

तालुक्यातील रानडुकराची शिकार प्रकरणातील आठ आरोपींना कळवण न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वनविभागाने मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे.

वाडी बुद्रुक येथे रानडुकराच्या मांसाची विल्हेवाट लावणार्‍या आठ आरोपींना रानडुकराच्या  मांसासह पिकअप व्हॅन व मोटारसायकलीसह वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अटक केली होती. कळवण तालुक्यातील बेदीपाडा, गोपालखडी, बालापूर, हिंगळवाडी येथील आठ संशयित आरोपींनी गेल्या सोमवारी (दि. 15) पहाटेदरम्यान कोपरगाव तालुक्यात रानडुकराची शिकार केल्याचे वनविभागाने केलेल्या चौकशीत समोर आले होतेे. आठही आरोपींना वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी मुखेड परिसरात नेण्यात आले होते. मात्र, आरोपींना दाखविलेला परिसर हा कोपरगाव तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणातील आरोपी पुंडलिक हरी बर्डे (50), संजय नामदेव महाले (30), पंढरीनाथ दगडू गांगुर्डे (32), मंगेश देवीदास चव्हाण (18), मनोहर लक्ष्मण बागूल (20), नामदेव दगडू गांगुर्डे (45), दामू लहानू गांगुर्डे (53), धनराज श्यामराव वाघ (29) यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9 व 51 व भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये कारवाई करण्यात आली.

दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्याने वनविभागाने आठही आरोपींना कळवण न्यायालयात आज उभे केले. वनविभागाने चौकशीसाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने पाच दिवसांची (22 जानेवारी पर्यंत) पोलीस कोठडी दिल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी बशीर शेख यांनी दिली.