Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Nashik › धुळे जिल्ह्यातील हत्या प्रकरणात 23 संशयितांना पोलीस कोठडी

धुळे जिल्ह्यातील हत्या प्रकरणात 23 संशयितांना पोलीस कोठडी

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 10:55PMधुळे : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले चोरण्याच्या अफवेतून झालेल्या पाच जणांच्या हत्येप्रकरणी शोध मोहीम राबवून रात्री उशिरापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. तर  जिल्हाधिकार्‍यांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.अटक केलेल्या संशयितांना तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी साक्री न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पाच पोलीस पथके तयार करण्यात आले आहेत.

दरम्यान, पीडित कुटुंबीयांनी  सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर आर्त किंकाळ्या मारत आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी नातेवाईकांच्या मागण्या मान्य करत पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली तसेच उर्वरित मदतीसाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पीडित कुटुंबीय सोलापूर जिल्ह्यात रवाना झाले.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अतिदुर्गम भागातील राईनपाडा या गावात गैरसमजातून रविवारी (दि.2) दादाराव श्यामराव भोसले (47), भारत शंकर भोसले (45), राजू श्रीमंत भोसले (45), भारत शंकर माळवे (45), अगन श्रीमंत हिंगोले (22) (सर्व रा. खवे ता. मंगळवेढा जि. सोलापूर) या पाच भिक्षेकरींना जमावाने दगड आणि अन्य वस्तूंनी ठेचून मारल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या सर्व मृतकांची ओळख पटविण्यात आली. या पाचही परिवाराने प्रशासनाच्या समोर मागण्या ठेवत प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा सोमवारी घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला. घरातील कर्तेपुरुष गेल्याने शासनाने प्रत्येकी 25 लाखांची मदत द्यावी, परिवारातील एका व्यक्‍तीस सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, मारेकर्‍यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची पोलिसांनी हमी घ्यावी यासह अन्य मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. 

25 लाखांची मदत जाहीर : अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे आणि अन्य अधिकार्‍यांंनी या परिवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. तर उर्वरित मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतले. या मृतांवर कर्नाटक तसेच मंगळवेढा परिसरातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.