Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Nashik › पोलीस वसाहतीला मिळेना घरपण!

पोलीस वसाहतीला मिळेना घरपण!

Published On: Mar 11 2018 11:58PM | Last Updated: Mar 11 2018 10:44PMअंबड : वार्ताहर

पोलीस कुटुंबीयांना राहण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने पांडवलेण्यांच्या पायथ्याशी पोलीस वसाहती बांधल्या आहेत. मात्र, या पोलीस वसाहती अनागोंदी कारभारामुळे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले असून, अवैध धंदे करीत आहेत. याकडे महापालिका व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, भविष्यात येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. 

गौळाणे रस्त्यावरील पांडवलेण्याच्या पायथ्याशी शेकडो एकर जमिनीवर नव्वदच्या दशकात पोलीस कुटुंबीयांच्या निवासासाठी शेकडो घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प महापालिका व पोलीस प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे बंद झाला.

शहरापासून लांब असल्याने पोलीस कुटुंबीय या ठिकाणी ये-जा करण्यास टाळाटाळ करीत होते. तसेच, बांधकाम व्यावसायिकास वेळेवर पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे व्यावसायिकाने पोलीस वसाहतीचे बांधकाम बंद केले. त्यामुळे  अनेक वर्षांपासून  वसाहतीमधील शेकडो घरे अपूर्णावस्थेत आहेत. महापालिका व पोलीस  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरांची दुरवस्था झाली आहे.

तरुणाईसाठी लव्हर्स पॉइंट!

पोलीस प्रशासन व महापालिका या वसाहतीकडे दुर्लक्ष असल्याने हे ठिकाणे तरुणाईसाठी लव्हर्स पॉईंट झाले आहे. तसेच, वसाहतीमधील पडक्या घरांचा उपयोग अनेक मद्यपार्ट्यांसाठी करीत आहेत. या परिसरात पथदिवे नसल्याने परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे.  याप्रकरणी महापालिका व पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. 

कुटुंबीयांच्या पदरी निराशा

पांडवलेण्यांच्या पायथ्याशी पोलीस वसाहत होणार, या आशेवर बांधकाम व्यावसायिकांनी येेथे घेरे बांधली.त्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या हौशीने घरे घेतली. मात्र दहा वर्षांपासून महापालिकेने या पोलीस वसाहतीसाठी ड्रेनेज, पिण्याचे पाणी, रस्त्यावरील पथदिवे, घंटागाडी आदी कोणत्याही प्रकारची सुविधा दिली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांवर पश्‍चाताप करण्याची वेळ आली आहे, अशी तक्रार अमृत विहार व अमेय पार्कमध्ये राहणा-या राजेश सुराळकर, प्रवीण चितारे, शिवाजी सांळूखे, संतोष जाधव, प्रफुल्ल काकुळते यांनी केल्या.