Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Nashik › नाशिक रेल्वे स्थानकाजवळील वादग्रस्त जागेत बॅरिकेट्स

नाशिक रेल्वे स्थानकाजवळील वादग्रस्त जागेत बॅरिकेट्स

Published On: Jun 05 2018 4:31PM | Last Updated: Jun 05 2018 4:31PMनाशिकरोड वार्ताहर 

नाशिक शहरात ओला वाहतूक आणि रिक्षा चालकामधील तणाव वाढला आहे. येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल आणि शहर पोलिसांच्या संयुक्त बंदोबस्तात विवादित जागेवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. ओला म्हणजेच ऑनलाईन खाजगी प्रवासी वाहतूक सेवेच्या जागेवरून रिक्षा चालक आणि रेल्वे प्रशासन यांच्यात वाद सुरू आहे. रिक्षा चालकांनी विरोध दर्शवलेल्या जागेतवर बॅरिकेट्स लावल्याने तणाव निर्माण झाला आहे.

मागील काही दिवसांपासून रिक्षा चालक आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये या प्रकरणावरून तणाव निर्माण झाल्याचे दिसून येते. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सुमारे तीस वर्षांपासून रिक्षा थांबा आहे. येथील रिक्षा थांब्याजळ ओला वाहतुकीला थांबा देऊ नये , अशी रिक्षा चालकांची मागणी आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 जवळ ओला वाहतूक थांब्याला जागा द्यावी, असा पर्याय रिक्षा संघटनेने सुचवला होता. यासंदर्भात मध्य  रेल्वेचे डीआरएम आर. के . यादव यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून निवेदन दिले होते.  रेल्वे सुरक्षा समितीचे सदस्य राजेश फोखणे , नितीन चिडे, मुख्य वाणिज्य प्रबंधक सुनीलकुमार मिश्रा , किशोर खडताळे , रमेश दाभाडे , सुनील शिंदे यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली होती. खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मध्यस्थी केली होती.  

यासंदर्भात दिल्ली येथे देखील शिष्टमंडळ जाऊन आले होते. रिक्षा चालकांनी दोन वेळा संप पुकारून ओला वाहतुकीचा निषेध नोंदविला आहे. मात्र मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाचे अधीक्षक जुबेर पठाण , नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे प्रबंधक कुठारे , सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकुर , नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह पन्नास जवानांच्या उपस्थित बॅरिकेट्स लावण्यात आले. चोक पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

समन्वयाने तोडगा हवा - रतन चावला सदस्य , झेडआरयुसीसी रेल्वे

ओला वाहतूक आणि रिक्षा वाहतूक दोन्ही घटक प्रवाशांकरिता महत्वाचे आहेत. रिक्षा चालक आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वयाने तोडगा काढायला हवा . दूर प्रवासाकरिता ओला तर लोकल करिता रिक्षा वाहतूक महत्वाची आहे.

रिक्षा चालकांच्या भूमिकेकडे लक्ष 

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर येत्या काही दिवसात ओला वाहतूक सेवा सुरू होणार आहे. यामुळे रिक्षा चालकांना व्यावसायिक स्पर्धक निर्माण होईल , याप्रकरणी आता रिक्षा चालक काय भूमिका घेतात याकडे प्रवासी , प्रशासनाचे लक्ष लागून आहेत.

ओला सुरू होऊन देणार नाही - किशोर खडताळे , अद्यक्ष रिक्षा संघटना 
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू आहे . त्यालागत तीनशे मीटर अंतराच्या आत कोणतीही दुसरी खाजगी वाहतूक सेवा सुरू करता येत नाही असा नियम आहे, येथील सुरू होणारी ओला वाहतूक बेकायदेशीर आहे. आरटीओ विभागाची परवानगी नाही . कोणत्याही परिस्थितीत ओला वाहतूक सुरू होऊन देणार नाही.