Thu, Mar 21, 2019 11:42होमपेज › Nashik › ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पोलिसांचा बंदोबस्त

ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पोलिसांचा बंदोबस्त

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 11:32PMनाशिक :  प्रतिनिधी

त्र्यंबकेश्‍वर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्‍त दर्शन आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले होते. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेने प्रयत्न केले तर इदगाह मैदानावर त्र्यंबकला जाण्यासाठी बसचे नियोजन केल्याने यंदा वाहतूक कोंडीची समस्या टळली. 

रविवारी (दि.26) सायंकाळी पाचपासून भाविक ‘बम बम भोले’च्या गजरात त्र्यंबककडे मार्गस्थ झाले. भाविकांची गर्दी वाढल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍तलक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्‍त डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांनी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करीत बस मार्गात अडथळा येणार नाही याचे नियोजन केले. त्यासाठी गरजेनुसार वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. यावेळी काही वाहनचालकांनी ठिकठिकाणी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीची समस्या होत होती.

त्यामुळे चारचाकी वाहनांवर टोईंग कारवाई करण्यात आली. या कारवाईस अनेकांनी विरोध केला. त्र्यंबकेश्‍वर येथेही ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. बसस्थानकापासून प्रदशिणा मार्ग आणि त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरात पोलिसांचा पहारा होता. साध्या वेशातीलही पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत बम बम भोले च्या गजरात भाविक प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होत होते.