Sun, May 19, 2019 22:32होमपेज › Nashik › रामकुंड : अर्धनग्‍न अवस्थेत भाविकांचीही धावाधाव

पोलीस, सुरक्षारक्षकांची वाहने ‘टोइंग’

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:56PMपंचवटी : वार्ताहर

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची वाहने टोइंग केली जात असतानाच, शुक्रवारी (दि. 1) मात्र गोदाघाटावरील रामकुंड परिसरातून भाविकांसह पोलीस व सुरक्षारक्षकांचीही वाहने उचलण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. अधिक मासानिमित्त स्नानासाठी आलेल्या भाविकांना अक्षरश: अर्धनग्‍न अवस्थेत आपल्या वाहनांमागे धावावे लागले. 

‘नो पार्किंग’ परिसरात वा वाहतुकीला अडथळा ठरू ठरणार्‍या ठिकाणी वाहने उभी केली असता, ती वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांकडून थेट टोइंग केली जातात. शुक्रवारी रामकुंड परिसरात सुरक्षारक्षकांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी विशेष शाखेचे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. मात्र, ऐन दुपारी 12 वाजता कपालेश्‍वर पोलीस चौकीसमोर वाहतूक पोलिसांनी आंदोलनासाठी आलेले सुरक्षारक्षक, त्यांच्या बंदोबस्तासाठी आलेले विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी साहेबराव कडाळे व     भाविक अशा सर्वांची दुचाकी वाहने उचलून नेली. त्यामुळे मोठाच गोंधळ उडाला. संतप्त सुरक्षारक्षकांसह नागरिकांनी थेट नवीन आडगाव नाक्यावरील वाहतूक पोलीस ठाण्यात धाव घेऊन उपस्थित कर्मचार्‍यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यांचा रोष पाहून उचलून आणलेली वाहने दंड न घेताच सोडण्यात आली.

दरम्यान, विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी कडाळे यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत बंदोबस्तासाठी रामकुंडावर आल्याचे स्पष्ट करूनही टोइंग कर्मचार्‍यांनी त्यांची दुचाकी सोडली नाही. अखेर कडाळे यांनाही वाहतूक शाखेच्या पोलीस ठाण्यातून वाहन सोडवावे लागले. अनेक भाविकांनी चोरीच्या भीतीने कपडे व पैसे आपापल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. स्नान आटोपून आल्यावर आपले वाहन उचलत असल्याने पाहून त्यांनी संबंधितांना विनंती केली. महिला, लहान मुले, युवक टोइंग कर्मचार्‍यांची अक्षरश: गयावया करीत होते. मात्र, अर्धनग्न अवस्थेत असूनही त्यांना कोणतीही दयामाया दाखविली गेली नाही. 

गेल्या काही दिवसांपासून वाहन उचलेगिरी करणार्‍या ठेकेदाराकडून केवळ रामकुंडावर देवदर्शन व धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांचीच वाहने उचलून नेली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. 

ठेकेदाराचीही गाडी उचलली

रामकुंड येथेे वाहन पार्किंगचा ठेका देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराची गाडीही त्याच्या आवारातून उचलून आणण्यात आली. या ठेकेदाराने पोलीस ठाण्यात जाऊन ‘तुम्हाला जागा मोजून दाखवू का’ अशा शब्दांत सुनावले. त्यानंतर त्याचे वाहन सोडण्यात आले.