Wed, Jul 24, 2019 06:34होमपेज › Nashik › पोलीस आयुक्त करणार जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा 

पोलीस आयुक्त करणार जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा 

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 12 2018 1:32AMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र दिनापासून आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली आहे. आंदोलकांनी शुक्रवारी (दि.11) आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर डॉ. सिंगल हे या प्रश्‍नी जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी. यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्यावर कर्मचारी ठाम आहेत.आरोग्य विद्यापीठ व कंत्राटी कामगार यांच्यातील वाद चिघळला असून, सेवेत कायम करावे या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून कामगारांचे आंदोलन सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही हा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली होती. 

गुरुवारी (दि.10) मात्र, रात्री पोलिसांनी आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक व पोलीस यांच्या बाचाबाची झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यावर शुक्रवारी तोडगा निघाला. कॉ. श्रीधर देशपांडे, कॉ.डी. एल. कराड, कॉ. सीताराम ठोंबरे आदींनी पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांची भेट घेऊन बाजू मांडली. त्यानंतर डॉ. सिंगल यांनी उपोषण सुरू ठेवण्यास परवानगी देत याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे आश्‍वासन दिले. दरम्यान, कंत्राटी कामगारांकडून साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यान प्रकृती बिघडल्याने पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.