Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › पोलीस आयुक्त डॉ. सिंगल ‘आयर्नमॅन’

पोलीस आयुक्त डॉ. सिंगल ‘आयर्नमॅन’

Published On: Aug 28 2018 1:34AM | Last Updated: Aug 28 2018 12:21AMनाशिक : प्रतिनिधी

फ्रान्समध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकचे पोलीस आयुक्तडॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी 15 तास 13 मिनिटे 21 सेकंद या वेळेत स्पर्धा पूर्ण करीत आयर्नमॅन किताब पटकावला आहे. चार किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग व 42 किलोमीटर रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप असते. या यशामुळे नाशिकसह देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

फ्रान्समधील विशी शहरात रविवारी (दि.26) वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत जगभरातील एक हजार 540 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील एक हजार 275 स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण करीत आयर्नमॅन किताब पटकावला. 16 तासांच्या आत तिन्ही स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन किताब मिळत असतो. त्यानुसार स्पर्धकांना खडतर मेहनत घेऊन तिन्ही टप्प्यांतून जावे लागते. डॉ. सिंगल यांनी पोहण्यासाठी एक तास 50 मिनिटे 17 सेकंद, सायकलिंगसाठी सात तास 12 मिनिटे  59 सेकंद आणि धावण्यासाठी पाच तास 45 मिनिटे 57 सेकंद इतका वेळ घेतला. याआधी 2015 मध्ये सुप्रसिद्ध मॉडेल आणि सिनेअभिनेता मिलिंद सोमण याने, तर 2017 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. डॉ. सिंगल यांना नाशिकच्या स्पोर्ट्समेड सेंटरमध्ये डॉ. मिलिंद पिंप्रीकर व रविजाचे प्रशिक्षक डॉ. मुस्तफा अबीद टोपीवाला यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धेत डेन्मार्क देशाच्या नॉर्मन बेनिक नामक स्पर्धकाने आठ तास 37 मिनिटे 37 सेकंदांत तिन्ही टप्पे पार करीत प्रथम क्रमांक पटकावला. 

फ्रान्समधील स्पर्धेत जगभरातील दीड हजार स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात भारतातून डॉ. सिंगल यांच्यासह त्यांची मुलगी रविजा सिंगल हिने सहभाग घेतला होता. मात्र, सायकलिंग स्पर्धेत रविजा पाच मिनिटे मागे राहिल्याने ती स्पर्धेतून बाद झाली. मात्र, या स्पर्धेच्या माध्यमातून बाप-लेकीने भारतासह नाशिकचे नाव आयर्नमॅन स्पर्धेत कोरले.  

‘आयर्नमॅन’चा ध्यास

डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट अमर मियाजी यांच्यासोबत झाली. त्यांच्याशी चर्चा करताना डॉ. सिंगल यांनीही आयर्नमॅन होण्याचा संकल्प केला. त्यासाठी डॉ. मुस्तफा टोपीवाला आणि डॉ. मिलिंद प्रिंपीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सिंगल यांनी सराव सुरू केला. नियंत्रित आहार, व्यायाम, धावणे, 20 ते 25 किमी सायकलिंग असा रोजचा सराव केला. दरम्यान, पुणे-गोवा 650 किमी डेक्कन क्लिफहँगर या स्पर्धेत डॉ. सिंगल यांनी सहभाग घेत स्वत:ची मानसिक व शारीरिक चाचणी घेतली होती. 

शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवरील कस या स्पर्धेत लागला. मात्र, मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम असणे आवश्यक वाटले. प्रत्येक स्पर्धा ही निर्धारीत वेळेत पूर्ण केल्याचे उद्दिष्ट असल्याने तेदेखील एक दडपण होते. मात्र, मी जिंकण्याची मानसिक तयारी केली होती. आणि ती पूर्ण केल्याचा मला आनंद होत असल्याचे डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले.