Mon, May 20, 2019 18:05होमपेज › Nashik › देवगाव आश्रमशाळेतील आठ मुलींना विषबाधा

देवगाव आश्रमशाळेतील आठ मुलींना विषबाधा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील देवगाव शासकीय आश्रमशाळेतील आठ मुलींना मंगळवारी (दि.27) रात्री दहा वाजेच्या दरम्यान विषबाधा झाल्याची घटना घडली. त्यांच्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

देवगाव आश्रमशाळेत आठ मुलींना विषबाधा झाल्याची माहिती श्रमजिवी संघटनेचे भगवान मधे यांना समजल्यानंतर त्यांनी मुलींना तत्काळ वैतरणानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली. देवगाव आश्रमशाळेत एकही कर्मचारी, शिक्षक मुख्यालयात हजर नसल्याने श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मुलींना दाखल केले.

इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंत शिक्षण घेणार्‍या साक्षी अस्वले, ज्योती वारे,  नंदिनी जाखेरे, चिऊ सराई, शकुंतला गोहिरे, मंजुळा हंबीर, निर्मला पारधी, कमल गोहिरे अशी मुलींची नावे आहेत. उपचार सुरू असताना या मुलींना पुन्हा त्रास होऊ लागल्याने पालघर जिल्ह्यातील खोडाळा या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे बुधवारी (दि.28) दुपारी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आश्रमशाळेची सुरक्षा वार्‍यावर

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील देवगाव येथे आदिवासी मुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेत 514 मुली शिक्षण घेत असून, विद्यार्थिंनींच्या सुरक्षिततेची नेहमीच वानवा असते. रात्रीच्या वेळी मुलींची सुरक्षा वार्‍यावर असताना विषबाधेमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी एक शिक्षक मुख्यालयी थांबत नसल्याने याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

 

Tags : Trimbakeshwar, Trimbakeshwar news, Devgaon Ashramshala, girls, Poisoning,


  •