Sun, Jul 21, 2019 01:46होमपेज › Nashik › नाशिक शहरातून झाडे हद्दपार

नाशिक शहरातून झाडे हद्दपार

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:46PMनाशिक : प्रतिनिधी

कधी काळी गुलशनाबाद आणि पर्यावरणाच्या द‍ृष्टीने सुखी शहर अशी ख्याती असलेले नाशिक आता त्यापासून दुरावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता आजूबाजूचा परिसर वनराईने फुलत असताना नाशिकच्या मध्यवर्ती भागात मात्र सिमेंटचे जंगल मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहे. शहर हद्दीतील सहा विभागांपैकी नाशिक पूर्व आणि नाशिक पश्‍चिम भागात अवघे एक टक्‍का वृक्ष असल्याचे मनपाच्या वृक्षगणनेतून समोर आले आहे. यावरून शहराच्या मध्यवर्ती भागातील वृक्षसंपदा नष्ट झाल्याचे समोर आले आहे.

महापालिकेने गेल्या वर्षी टेरेकॉन इन्फोटेक या संस्थेशी करार करत वृक्षगणना करण्याचे काम हाती घेतले. या गणनेचे काम जवळपास पूर्ण झाले असून, शहरात 47 लाख 95 हजार 387 इतकी वृक्षसंपदा असल्याचे आढळून आले आहे. नाशिक शहरात इतकी मोठी वृक्षसंपदा असल्याचे सुखावह चित्र असताना दुसरीकडेमात्र शहराचा मध्यवर्ती भाग भौतिक सुखांनी अद्ययावत असा होत असला तरी वृक्षांविना ओसाड बनल्याचे वास्तव लपून राहिलेले नाही. मनपाच्या वृक्षगणनेत सर्वाधिक वृक्ष पंचवटी विभागात आढळून आले आहेत. एकूण वृक्षसंख्येच्या तुलनेत ही संख्या 37 टक्के म्हणजे 17 लाख 52 हजार 177 इतकी आहे. त्याखालोखाल सिडको विभागात 15 लाख 85 हजार 618 (33 टक्के) इतके वृक्ष आहेत.

त्याचबरोबर नाशिकरोड विभागात आठ लाख 18 हजार 18 (17 टक्के) आणि सातपूर विभागात पाच लाख दोन हजार 873 (10 टक्के) वृक्ष आढळून आले आहेत. शहरातील पंचवटी, सिडको, नाशिकरोड आणि सातपूर या चार विभागांत वृक्षांचे प्रमाण समतोल असले तरी शहराचा मध्यवर्ती असलेला व प्रदूषणाच्या द‍ृष्टीने सर्वाधिक चिंतेचा भाग असलेल्या नाशिक पश्‍चिम व नाशिक पूर्व विभागात वृक्षांचे प्रमाण अवघे एक टक्‍का इतकेच असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. म्हणजे या दोन्ही विभागांत वृक्षतोड करून केवळ सिमेंटचे जंगलच उभे राहत आहे. यातील पश्‍चिम विभागाची हायप्रोफाईल अन् उच्चभू्रंची वस्ती अशी ओळख आहे. असे असताना या भागातील पर्यावरणाविषयीची हेळसांड मात्र विचार करायला लावणारी नक्‍कीच आहे.