Tue, Apr 23, 2019 06:26होमपेज › Nashik › हमीभाव हाच शेतकरी आत्महत्येवर पर्याय!

हमीभाव हाच शेतकरी आत्महत्येवर पर्याय!

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 24 2018 12:21AMपिंपळगाव बसवंत : वार्ताहर

कर्जबाजारीपणामुळे सुरू असलेले शेतकरी आत्महत्येचे सत्र अत्यंत चिंताजनक असून, संपूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव हाच शेतकरी आत्महत्येवर अंतिम पर्याय असल्याचे मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी पिंपळगाव बसवंत येथे आले असता त्यांनी खास माधवराव खंडेराव मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माधवराव मोरे बोलत होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, माजी आमदार दिलीप बनकर, संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, युवा नेते रणजीत बागल आदी उपस्थित होते.

मोरे म्हणाले, संपूर्ण देशात निफाड तालुका अत्यंत सधन तालुका म्हणून परिचित आहे. मात्र, शेतकरी आत्महत्येची  लाट सधन निफाड तालुक्यापर्यंत येऊन पोहचलीच नाही. तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्या नाशिक जिल्हा व तालुक्यात  होत आहे. यातूनच शेती आणि शेतकर्‍यांची द्रावक स्थिती जगासमोर आली असल्याचे स्पष्ट केले. देशातील सर्वच शेतकरी संघटनांनी आता एकत्र येऊन आपल्याच बांधवांचे जीव वाचविण्यासाठी कर्जमुक्ती व हमीभावाचा लढा प्रखरपणे लढला पाहिजे, असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला. खासदार शेट्टी म्हणाले, अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समिती या झेंड्याखाली देशातील 192 शेतकरी संघटना एकत्र आल्या असून, कर्जमुक्ती  आणि हमीभावाचा कायद्याने हक्क मिळविण्यासाठी आता रणशिंग फुंकले आहे. संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, यासाठी कायद्यात तरतूद करावी म्हणून शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. लवकरच मुंबई व दिल्ली आदी ठिकाणी शेतकर्‍यांचा निर्धार मोर्चा आयोजित करून सरकारवर दबाव टाकला जाईल, असे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.