Sat, Jul 20, 2019 23:55होमपेज › Nashik › पेट्रोल ऐंशीपार

पेट्रोल ऐंशीपार

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:12PMनाशिक : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात भरमसाठ वाढ झाली असून, परिणामी इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. नाशिकमध्ये सोमवारी (दि.22) पेट्रोलसाठी लिटरला 80 रुपये 43 पैसे इतका दर असून डिझेलचीही 70 रुपये प्रतिलिटर दराकडे वाटचाल सुरू असून, त्याचे दर 66.35  प्रतिलिटर पर्यंत पोहोचले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोमवारी कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅलर 63 डॉलरपर्यंत गेला होता. काही दिवसांपासून ही परिस्थिती कायम असून, त्याचा परिणाम देशात पाहायला मिळत आहे. त्यात तेल कंपन्यांना दर ठरविण्याचे अधिकार बहाल केल्याने पेट्रोल व डिझेलचे दर रोज बदलत आहेत.

डिसेंबरमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 76.97 रुपये तर डिझेलचे दर 60.63 रुपये इतके होते. मात्र, नवीन वर्षात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.46 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 5.72 रुपयांनी वाढ झाली आहे. 

भरमसाट करांमुळे दर भडकले

एकीकडे इंधनाचे दर सातत्याने वाढत असले तरी सद्यस्थितीत पेट्रोलचा मूळ दर प्रतिलिटर हे 54.20 रुपये इतका आहे. मात्र, त्यावर 25 टक्के व्हॅट, सेल्स टॅक्स व अतिरिक्त टॅक्स यामुळे पेट्रोलचा दर 80 रुपये पार पोहोचला आहे. तीच गत डिझेलच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे. डिझेलचा मूळ दर हा 51.92 रुपये प्रतिलिटर इतका आहे. मात्र, भरमसाठ टॅक्समुळे हा दर प्रतिलिटर 66 रुपयांपर्यंत गेला आहे.