Sat, Sep 22, 2018 06:47होमपेज › Nashik › इंधन दराचा भडका

इंधन दराचा भडका

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:31AMनाशिक : प्रतिनिधी

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने देशाअंतर्गत विविध शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. नाशिकमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 82.20 पैसे, तर डिझेल दर 68.43 पैशांवर पोहचले आहे. अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्यांना आता इंधन दरवाढीची झळ असह्य झाली आहे. दरम्यान, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल व डिझेलच्या दराने रेकॉर्डब्रेक केले असल्याचे बोलले जात आहे. दरवाढीमुळे वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे.

मागील एक महिन्यापासून पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गाडीत इंधन भरताना वाहनचालकांना दहा वेळा विचार करावा लागत आहे. गत आठवड्यात पेट्रोलचे दर 79 रुपये इतके, तर डिझेलचे दर हे साधारणत 66 रुपयांपर्यंत होते. मात्र, रविवारी (दि.8) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दर भडकल्याचे पाहायला मिळाले. पेट्रोलचा दर हा 82 रुपये पार, तर डिझेलचे दर हे 68 रुयपे प्रतिलिटर पलीकडे गेले आहे. भरमसाट दरवाढीमुळे अगोदरच सर्वसामान्य मेटाकुटीला आले होते. आता पुन्हा नवी दरवाढ लागू झाल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वाहनचालकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसच्या काळातही इंधनासाठी एवढे दर कधी मोजावे लागले नव्हते, असे सांगत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर ठरविण्याचे सर्व अधिकार हे तेल कंपन्यांना दिले आहेत.