Tue, Jul 16, 2019 01:40होमपेज › Nashik › जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेने लोकप्रतिनिधी बेजार

जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेने लोकप्रतिनिधी बेजार

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:22PMनाशिक : प्रतिनिधी 

माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनीही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा पत्राद्वारे उजेडात आणला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आडमुठ्या भूमिकेने लोकप्रतिनिधी बेजार झाल्याचे दिसून येत आहे.येवला, नांदगाव, सिन्नर, सटाणा यांसारख्या काही तालुक्यांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. पर्जन्यमान कमी असल्याने फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच टँकरची मागणी होत असते. हे वास्तव असले तरी जिल्हाधिकार्‍यांना मात्र ते मान्यच नाही, असा अर्थ काढला जात आहे. ज्यावेळी येवला तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाले, त्यावेळी मार्चमध्ये टँकर देऊ, असे धोरण जिल्हाधिकार्‍यांनी स्वीकारून येवल्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरच संशय घेतला होता. 

सद्यस्थितीत  खर्‍या अर्थाने टंचाईची भीषणता जाणवत असतानाही टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे धूळ खात पडून आहेत.  भुजबळ यांनी सोमवारी पत्र लिहून येवला तालुक्यात टंचाईचा सामना करीत असलेल्या गावांची यादीच सादर केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्काळ प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भातही पत्रात नमूद करण्यात आले.त्यानंतर दुसर्‍याच दिवशी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सांगळे यांनीही सिन्नर तालुक्यातील प्रस्ताव मंजुरीअभावी धूळ खात असल्याचे पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले. पाण्याचे स्रोत कोरडे झाल्याने अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजना कूचकामी ठरल्या आहेत. वाड्या-वस्त्यांवर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना नसल्याने जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्हाभरातूनच टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्रुटी दाखवून ते बाजूला ठेवले जात आहेत. सध्या हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळ खात असल्याचे पत्रात म्हटले आहे.दुसरीकडे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या रोषाचा सामना लोकप्रतिनिधींना करावा लागत आहे. प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी, असे शीतल सांगळे यांनी नमूद केेले आहे.