नाशिक : प्रतिनिधी
पेन्शनर्सधारकांना महागाई भत्यासह 6 हजार 500 रुपये पेन्शन द्यावे, कोेशियारी समितीचा अहवाल लागू करावा. यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील पेन्शनर्सने सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनतर्फे यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्रातील सरकार सत्तेत येण्यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 90 दिवसात इपीएफ 95 धारकांना तीन हजार रुपये पेन्शन महागाई भत्यासह देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने स्थापन केलेल्या डॉ. कोशियारी समितीने ही त्यांच्या अहवालात महागाई भत्यासह पेन्शन देण्याची शिफारस केली आहे. लोकसभेतही यावर सकारात्मक चर्चा झाली असून, अनेक खासदारांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, गेल्या चार वर्षात याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे याप्रश्नी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या 7 व 8 मार्च रोजी दिल्लीत देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
आंदोलनात राजू देसले, सुधाकर गुजराथी, डी. बी. जोशी, सुभाष काकड, चेतन पणेर, विलास विसपुते, बापू रांगणेकर, शिवाजी शिंदे यांच्यासह जिल्हाभरातून आलेले पेन्शनर्सधारक सहभागी झाले होते.