Sun, Jul 05, 2020 07:01होमपेज › Nashik › रुपयाच्या विडीचा धूर पडला शंभर रुपयांना

रुपयाच्या विडीचा धूर पडला शंभर रुपयांना

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 17 2017 12:01AM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

 यंत्रमागाबरोबर चहा आणि विडीप्रेमींसाठी मालेगाव शहर ओळखले जाते. परंतु, यापुढे महापालिका आवारात विडीची तल्लफ भागविणार्‍यांना आर्थिक झळ सोसावी लागेल. स्वच्छ सर्वेक्षण- 2018 साठी सज्ज होत असलेल्या प्रशासनाने मनपा मुख्यालयात धूम्रपान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईला प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत शनिवारी विडीचा धुरका घेणार्‍या इसमाला 110 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षण-2017 साठी अभियान राबवताना मालेगाव महापालिकेने हागणदारीमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून शहरातील 50 हून अधिक ठिकाण हागणदारीमुक्त होऊन तसे राज्य शासनाने जाहीरदेखील केले. परंतु, नेहमीप्रमाणे यंत्रणा ढेपाळली अन् पुन्हा परिस्थिती जैसे थे होण्यास सुरुवात झाली. स्वच्छतेसंदर्भात नागरिकांची तयारी झालेली मानसिकता अधिक उंचीवर नेण्याच्या दृष्टीने प्रशासन सक्रीय झाले आहे. स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना उद्दीष्ट निश्‍चित होत आहे.

 शनिवारी दुपारी मनपाच्या जुन्या इमारतीजवळ एक व्यक्ती विडीचे धुरके सोडत असल्याची बाब सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ स्वच्छता निरीक्षकाला संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार अब्दुल कय्युम अब्दुल रझा (रा. रसुलपुरा) या विडीप्रेमीला 110 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईमुळे चैन स्मोकर्सनी चांगलीच धास्ती घेतली आहे. यापूर्वी उघड्यावर शौचास जाणार्‍यांना दंडात्मक कारवाईबरोबरच पोलिस ठाण्याची वारी घडवण्यात आली होती. त्याचा सकारत्मक परिमाण होऊन मोसम नदी परिसरातील हागणदारीला लगाम लागला होता. आता सार्वजनिक ठिकाणी त्यातच मनपा मुख्यालयाजवळ धूम्रपान करणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांमधून स्वागत होत आहे.
धूम्रपान करणार्‍यांवर 

सीसीटीव्हीची राहणार नजर

शहरात धूम्रपान करणार्‍यांची कमी नाही. सार्वजनिक ठिकाणांवरदेखील बिनदिक्कतपणे धूर सोडताना दुसर्‍यांना त्रास होतो, हे कुणाच्या गावी नसते. संबंध शहरात हे चित्र पहायला मिळते. हि परिस्थिती मालेगाव महापालिका परिसरात तरी बदलेल, असे वाटते. महापालिका आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सुरक्षेबरोबरच धूम्रपान करणार्‍यांना अटकाव करण्यासाठी त्यांचा वापर होईल. एकाहून अधिक वेळा धूम्रपान करताना आढळणार्‍यावर पोलिसात गुन्हा दाखल होणार आहे. मनपा इमारतीत तसेच आवारात पान- मसाला, गुटखा खावून पिचकार्‍या मारणार्‍यास एक हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते.