Mon, Mar 25, 2019 05:26
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मतदान केंद्रांत पेन, मोबाइल, कॅमेर्‍यास बंदी 

मतदान केंद्रांत पेन, मोबाइल, कॅमेर्‍यास बंदी 

Published On: May 19 2018 1:34AM | Last Updated: May 18 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिक स्वराज्य संस्थेसाठी येत्या सोमवारी (दि.21) मतदान होत असून प्रत्येक तालुकास्तरावर एक असे 15 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रांत पेन, मोबाइल, कॅमेरा तसेच घड्याळ नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम केंद्रावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना लागू असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.18) जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत निवडणुकीची बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे यांच्यासह निवडणूुकीतील उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे, नरेंद्र दराडे हेही उपस्थित होते. 

निवडणूक नियमांविषयी यावेळी उमेदवारांसह अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बॅलेट पेपरची विशिष्ट पद्धतीने घडी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या जांभळ्या शाईच्या पेनद्वारेच मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावसमोर पसंतीक्रम टाकावा, अशा सुचना देण्यात आल्या. दरम्यान, दुसर्‍या पेनचा वापर केल्यास मतपत्रिका बाद होणार आहे. त्यामुळे केंद्रावरील अधिकार्‍यांनी मतदारांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. 

मतदानावेळी मतपत्रिकेवर इंग्रजी, मराठी अथवा रोमन भाषेत आकडे लिहावेत. पसंतीक्रम अक्षरी लिहिल्यास ती मतपत्रिका बाद ठरेल. मतपत्रिका विशिष्ट पद्धतीने घडी घालून मतदारांना दिली जाईल. संबंधितांनी मत नोंदविल्यावर ती त्याच पद्धतीने घडी करून मतपेटीत टाकणे आवश्यक आहे. मतपत्रिकेवर काही खुणा केल्यास, मागील बाजूने काही लिहिल्यास ती मतपत्रिकाही बाद होईल, असेही यावेळी प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, अंध, दिव्यांग आणि अशिक्षीत मतदाराला जर मदत हवी असेल तर त्याने अगोदर तसा अर्ज निवडणुक निर्णय अधिकार्‍यांकडे भरुन देने बंधनकारक असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

अद्यापही बैठकीचा पत्ता नाही

नाशिक : विधान परिषदेचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असले तरी निवडणुकीशी संबंधित प्रचार परवानगी, विद्रुपीकरण व तक्रार निवारणासाठीची बैठकीचा पत्ताच नाही. यामुळे निवडणूकीबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे अधोरेखित झाले आहे. विधान परिषद निवडणूकीचा फड तापला असून उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. निवडणूक रिंगणातील तीन्ही उमेदवार स्वत:च्या विजयाचा दावा करत आहेत. राजकीय स्तरावर एकीकडे निवडणूक रंगात असताना प्रशासकीय स्तरावर मात्र, सारेच आलबेल असल्याचे चित्र आहे. वास्तविक निवडणूकीदरम्यान,  प्रचार परवानगी, विद्रुपीकरण तक्रारीसह विविध प्रशासकीय कामासाठी उपअधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत नायब तहसिलदार तसेच विविध विभागांच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. निवडणूकीत प्रचाराच्या अनुषंगाने परवानग्या देण्याचे प्रमुख कार्य ही समिती पार पाडत असते.