Sun, Mar 24, 2019 11:03होमपेज › Nashik › औरंगाबाद दंगलीत पोलिसांची बघ्याची भूमिका

औरंगाबाद दंगलीत पोलिसांची बघ्याची भूमिका

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड शोधायला हवा. औरंगाबाद येथील दंंगल एकदम उसळलेली नाही. तेथे आधीच खदखद होती. कोणावर अन्याय होऊ नये, जातीय सलोखा राखणे, ही जबाबदारी सरकारची असताना या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनांप्रकरणी सरकारवर अपयशाचे खापर फोडले.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत मतांची विभागणी टाळण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले असून, चर्चाविनिमय करून जागावाटप करून घेण्यात आल्या. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. मनसेने सहाणे यांना पाठिंबा दिला यावर विचारले असता ते म्हणाले की, महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मनसेचे काही नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारविरोधात सर्वच छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधणे सुरू केले असून, आगामी निवडणुकांमध्ये मनसेची साथ घेण्याबाबतच्या विचारलेल्या प्रश्‍नावर पवार यांनी सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रश्‍न असल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. 

 आगामी निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे, यावर दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत.  उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्यानंतर वेगळे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्रात समविचारी पक्षांना सोबत घेताना प्रमुख मित्र पक्षांनी एकमेकांना विचारात घ्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद येथील दंगल एकदम उसळलेली नाही. तेथे आधीच खदखद होती. प्रमुख शहर असूनही पोलीस आयुक्त नाही. ही कुठली पद्धत? सरकारने या घटनेकडे दुर्लक्ष केेले. भीमा-कोरेगावची घटनाही अशीच होती. या दोन्ही घटना सरकारचे अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या यंत्रणेकडून व्यवस्थित माहिती मिळत असते. मग, माहिती मिळाल्यावर योग्य पावले उचलायला ते कमी पडतात की काय ते माहीत नाही, अशी शंका घेण्यात आली. भीमा-कोरेगावची घटना  आणि औरंगाबादची दंगल या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. 

कोणावर अन्याय होणार नाही,  ही सरकारची जबाबदारी आहे. भीमा-कोरेगाव घटनेचा मास्टर माइंड कोण आहे, हे शोधायला पाहिजे. जातीय सलोखा राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. नगर जिल्ह्यात राजकीय कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना गोळ्या झाडून ठार केले गेले. या प्रकरणी दोषी असणार्‍यांना फाशी द्या. उगाच कोणालाही आत टाकू नका, असे पवार म्हणाले.

अधिकारी मालक झाले का?

शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झाला. रोजगार निर्मिती नाही. शिक्षण घेऊन काय भजी तळायची. लोकांना फसविण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पिवळ्या पट्ट्यातील जमिनींना लाखो रुपयांचा टॅक्स लावला. पालकमंत्री बोलायला तयार नाहीत. निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या मंत्र्यांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. अधिकारी मालक झाले काय, नेमका कोण कोणासाठी राज्य चालवित आहे, असा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून रिंगणात असलेल्या अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निर्मला गावित, आमदार हेमंत टकले, आमदार दीपिका चव्हाण, आमदार जयवंत जाधव, आमदार डॉ. अपूर्व हिरेे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर आदी प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले की, 32 वर्षांच्या काळात राज्यात एवढी वाईट परिस्थिती पाहिली नव्हती. लोक कर्ज बुडवून पळून जात आहेत. जीएसटीचे त्यांनाही कळेनासे झाले आहे. हिमांशू रॉयसारखे अधिकारी आत्महत्या करीत आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. आधी भीमा-कोरेगाव आणि त्यानंतर  औरंगाबाद येथील दंगल म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका आल्या की, अशा घटना घडतात. पोलीस मात्र हतबल झाले आहेत. महिलांवर अन्याय, बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात सात दिवसांत बारा खून झाले. पोलीस भरतीत भ्रष्टाचार झाला आहे.दूध, उसाला भाव मिळत नाही. 1400 कोटींची तूर कोल्हापूरमध्ये सडत आहे. शेतकर्‍यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल सरकारला सांभाळता येत नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणारे सरकार मात्र लोकांना दिलेल्या आश्‍वासनांवर बोलत नाही. आता सरकारविरोधात एकत्र येण्याची वेळ आली आली असून, आघाडीचे प्रत्येक मत सहाणे यांना पडेल, याची जबाबदारीच त्यांनी स्थानिक नेत्यांवर सोपविली.