Mon, May 27, 2019 00:44होमपेज › Nashik › पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या घळभरणीचा मार्ग मोकळा

पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या घळभरणीचा मार्ग मोकळा

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 11:11PMनाशिक : प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील भाम प्रकल्प क्षेत्रातील दरेवाडी गावातील अखेरच्या 40 कुटुंबांशी प्रशासनाने केलेली चर्चा अखेर यशस्वी ठरली. या सर्व कुटुंबांचे गावापासून जवळच असलेल्या प्लॉटवर प्रशासनाने पुनर्वसन केले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी पाचशे प्रकल्पांमधील महत्त्वाचा असलेल्या भाम प्रकल्पातील घळभरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या धरणात यंदा पाणी साठविणेदेखील शक्य होणार आहे.

ग्रामस्थांचे पुनर्वसन हा  या प्रकल्पातील मोठा अडथळा होता. प्रकल्पासाठी परिसरातील दरेवाडीसह चार गावांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. मात्र, दरेवाडी गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसनास नकार दिला होता. परिणामी, गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. दरम्यानच्या काळात प्रशासनाने दरेवाडीतील कुटुंबीयांना चार ते पाच ठिकाणी प्लॉट देत पुनर्वसन करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत गावातील काही कुटुंबीयांनी स्थलांतरही केले. परंतु, 40 कुटुंबीयांनी गाव सोडून जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रशासनासमोरील डोकेदुखी वाढली होती. 

प्रकल्पाचे काम सुमारे 95 टक्क्यांपर्यंत झाले आहे. त्यामुळे प्रकल्पात यंदा पाणी साठवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पाच्या पाण्यात दरेवाडी हे बुडणारे पहिले गाव आहे. त्यामुळे प्रशासनाने गत आठवड्यात गावातील 40 कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी संबंधितांना परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर मात्र, या कुटुंबीयांनी स्थलांतरणास होकार दर्शविला. गावालगतच असलेल्या प्लॉटवर गेल्या तीन दिवसांपासून या कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जात आहे. यामध्ये घरासह पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह तसेच इतर सोयीसुविधा तत्पुरत्या स्वरूपात या कुटुंबीयांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच धरणातील पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.