Tue, Jan 22, 2019 12:00होमपेज › Nashik › महिनाभरानंतरही पथदीपांची माहिती देण्यास चालढकल

महिनाभरानंतरही पथदीपांची माहिती देण्यास चालढकल

Published On: Aug 31 2018 1:40AM | Last Updated: Aug 30 2018 11:50PMनाशिक : प्रतिनिधी

दलितवस्ती सुधार योजनेसाठी दरवर्षी प्राप्त होणार्‍या निधीतून बहुतांश पथदीपांचीच कामे हाती घेण्यात आल्याने संशयाला जागा निर्माण झाली असून, चार वर्षांत नेमके किती पथदीप बसविले आणि किती सुस्थितीत याविषयी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने विचारलेली माहिती सादर करण्यास तालुका पातळीवरून चालढकल सुरू आहे. 

सरकार पातळीवरून या योजनेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असतो. या निधीतून नेमकी काय कामे घ्यायची हेही ठरवून देण्यात आले आहे. सामाजिक सभागृह, गटारी, काँक्रिटीकरण, पथदीप आदी कामांचा त्यात समावेश आहे. दलितवस्तीचा विकास हा या मागचा उद्देश असला तरी कोट्यवधीचे आकडे बघून अधिकार्‍यांचे डोळे पांढरे होत आहेत. कामे मिळविण्यासाठी स्वत:च सरपंच आणि ग्रामसेवक सरसावत असल्याने निधी खर्चाविषयी गूढ वाढले आहे.

विशेष म्हणजे, निधी असूनही 2007-08 पासून बरीचशी कामे प्रलंबित असल्याने संशयाला जागा निर्माण झाली आहे. समितीच्या मासिक सभेत दरवेळी आढावा घेतला जात असून, कामे पूर्ण करण्याची सूचना तेवढी केली जात आहे. चार वर्षांत योजनेतून मोठ्या प्रमाणात पथदीप बसविण्यात आले असून, गेल्या सभेत सदस्यांनी त्यावर आक्षेप नोंदविला. दरवर्षीच पथदीपांची कामे कशी करण्यात आली, यावरही बोट ठेवण्यात आले. त्यामुळे चार वर्षांत नेमके किती पथदीप बसविण्यात आले, त्यापैकी किती पथदीप सुस्थितीत आहेत, याविषयी माहिती सादर करण्याचे आदेश तालुका पातळीवर देण्यात आले होते.