Fri, Jul 19, 2019 18:05होमपेज › Nashik › नाशिकमध्ये पार्किंगसाठी होणार बहुमजली वाहनतळ

नाशिकमध्ये पार्किंगसाठी होणार बहुमजली वाहनतळ

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:16AMनाशिक : प्रतिनिधी

शहरातील वाहन पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी योजनेंंतर्गत यांत्रिकी पद्धतीच्या पार्किंगबरोबर ऑनस्ट्रीट व ऑफस्ट्रीट पार्किंगची सेवा येत्या काही महिन्यांत नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानुसार ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वानुसार शहरात यशवंत मंडई, सीतागुंफा येथे बहुमजली पार्किंग इमारत उभारण्यात येणार असून, शिवाजी स्टेडियम येथे अंडरग्राउंड दुमजली पार्किंग साकारण्याचे प्रस्तावित आहे. 

नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीची बैठक अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात स्मार्ट सिटी योजनेंंतर्गत विविध विकासकामांना मंजुरी तसेच निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी देण्यात आली. शहराचा विस्तार व वाहनांचा वाढता वापर पाहता वाहतूक कोंडी व पार्किंगचा प्रश्‍न बिकट होत चालला आहे. त्यादृष्टीने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात 28 ठिकाणी ऑनस्ट्रीट व पाच ठिकाणी ऑफस्ट्रीट पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी इन्सप्रिया व ट्रायजंट या दोन कंपन्या पात्र ठरल्याने त्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या यशवंत मंडई या जुन्या इमारतीच्या जागी 212 कारसाठी बहुमजली पार्किंगची इमारत साकारली जाणार असून, सीतागुंफा येथील प्लॉट क्रमांक 167 येथेही 212 कारची क्षमता असलेली बहुमजली पार्किंग उभारण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे अंडरग्राउंड दोन मजली पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव आहे. या ठिकाणी 682 कार पार्किंगची क्षमता असेल. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात फुलोरा फाउंडेशनच्या सहकार्याने शेअरिंग सायकल हा उपक्रम सुरू केला जाणार असून, याचप्रकारे आणखी 17 ठिकाणी हा उपक्रम सुरू केला जाईल. तीन महिन्यांत एक हजार सायकल या उपक्रमात सहभागी होतील. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रोडच्या कामाला मंजुरी देण्यात आली. सी फोर इन्फ्रास्ट्रक्‍चर या संस्थेकडून हे काम होणार असून, त्यासाठी 14 कोटी 53 लाख इतका खर्च होणार आहे. बैठकीत स्थायी सभापती हिमगौरी आडके, गुरुमित बग्गा, शाहू खैरे यांची संचालक तर भास्कर मुंढे यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. 

उपमहापौरांना टाळले

संचालक तथा महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, सभापती हिमगौरी आडके यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले. यापूर्वीच्या बैठकींना या पदाधिकार्‍यांसह उपमहापौर प्रथमेश गिते यांनाही बोलविले होते. परंतु, बुधवारी (दि.11) झालेल्या बैठकीला उपमहापौरांना टाळण्यात आले. यामुळे गिते यांनी नाराजी व्यक्‍त केली. मनपात एकहाती सत्ता असूनही कुणाचेच काही चालत नसल्याचा गिते यांच्याप्रमाणेच अनेकांना अनुभव येत असल्याने या नाराजीतूनच अनेकजण पक्षाला घरचा आहेर देत असतात. 

315 कोटींची कामे मंजूर 

शहरातील गावठाण भागात म्हणजेच जुने नाशिकसाठी स्काडा मीटर व 24 तास पाणी, मलवाहिका, मोठे व मध्यम रस्ते अशा विविध विकासकामांविषयी चर्चा होऊन त्यास मंजुरी देण्यात आली. तसेच येत्या आठ ते दहा दिवसांत या विकासकामांच्या निविदा जाहीर केल्या जाणार असल्याने ही कामे येत्या वर्षभरात दिसू लागतील.