Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Nashik › परीक्षेआधीच पेपर सोशल मीडियावर

परीक्षेआधीच पेपर सोशल मीडियावर

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 28 2018 11:27PMउपनगर : वार्ताहर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शनिवारी (दि. 28) होणार्‍या  एसवायबीएससीच्या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका  शुक्रवारीच (दि.27) रात्री 12 वाजेनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्‍कादायक प्रकार आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. प्रश्‍नपत्रिका फुटीची खातरजमा करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.28) सकाळी पोलीस संरक्षणात थेट बिटको महाविद्यालय गाठले. रात्री 12 वाजेनंतर सोशल मीडियावर आलेली आणि परीक्षा केंद्रात विद्यार्थी सोडवत असलेली प्रश्‍नपत्रिका एकच असल्याचे यावेळी निदर्शनास आले. यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा सदोष असून, ही परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भावे यांनी विद्यापीठाकडे केली आहे.

एसवायबीएससीच्या शनिवारी (दि.28) होणार्‍या परीक्षेत लिनिअर अल्जेब्राची प्रश्‍नपत्रिका सोशल मीडियावर शुक्रवारीच प्रसारित झाली. याबाबतची माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भावे यांना काही कार्यकर्त्यांनी दिली. खरोखर प्रश्‍नपत्रिका फुटली आहे का? याची शहानिशा करण्यासाठी आम आदमीचे कार्यकर्ते बिटको महाविद्यालयात पोहोचले. यावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण आणि पोलीस कर्मचारीही पोहोचले. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य राम कुलकर्णी यांची भेट घेऊन चालू असणार्‍या पेपरची प्रश्‍नपत्रिका दाखवण्याची विनंती केली. त्यानंतर पोलीस संरक्षणात प्रश्‍नपत्रिका तपासली असता सोशल मीडियावरील प्रश्‍नपत्रिका आणि परीक्षा केंद्रातील प्रश्‍नपत्रिका सारखीच असल्याचे निदर्शनास आले. पेपरफुटीची खात्री होताच आम आदमी पार्टीने पेपर फुटल्याचे जाहीर केले. प्राचार्य कुलकर्णी यांनी महाविद्यालयाचा कोणताही दोष नसून विद्यापीठाच्या यंत्रणेकडून हा पेपर फुटला असावा, असे मत व्यक्‍त केले आहे.