होमपेज › Nashik › पं. उल्हास बापट यांचे नाशिकशी गहिरे ऋणानुबंध

पं. उल्हास बापट यांचे नाशिकशी गहिरे ऋणानुबंध

Published On: Jan 05 2018 1:17AM | Last Updated: Jan 04 2018 11:30PM

बुकमार्क करा
 नाशिक : प्रतिनिधी

मुंबई येथील प्रख्यात संतूरवादक पं. उल्हास बापट यांचे नाशिक शहराशी गहिरे ऋणानुबंध होते. त्यांच्या अनेक मैफली शहरात रंगल्या होत्या, तर येथील नाट्यसंस्थांच्या नाटकांनाही त्यांनी पार्श्‍वसंगीत दिले होते. पं. बापट यांच्या निधनानंतर शहरातील सांस्कृतिक विश्‍वाने या आठवणींना उजाळा दिला. 

पं. बापट यांचे ज्येष्ठ बंधू तथा अभिनेते आनंद बापट व वास्तुविशारद विवेक बापट यांचे नाशिकरोड येथे वास्तव्य आहे. त्यामुळे पं. उल्हास बापट यांचे शहरात अधूनमधून येणे होत असे. मान्यवरांनी दिलेल्या माहितीनुसार, पं. बापट यांची शहरातील पहिली मैफल ‘कलाअर्घ्य’ या संस्थेतर्फे 1 फेब्रुवारी 1974 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याकाळी लोकांना संतूर वाद्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे दुर्गा मंगल कार्यालयात झालेल्या या मैफलीत पं. बापट यांनी प्रथम संतूरविषयी मार्गदर्शन केले होते. संतूर हे वाद्य किती दुर्मिळ असून, त्याची खासियत काय, हे त्यांनी रसिकांना आत्मीयतेने समजावून सांगितले होते. त्यानंतर सुमारे दीड तास त्यांच्या स्वर्गीय संतूरवादन मैफलीचा आनंद नाशिककरांनी घेतला होता. 

नाशिकरोडच्या ‘ऋतुरंग’ संस्थेतर्फे सन 2004 मध्ये त्यांचा भारतीय शास्त्रीय व पाश्‍चात्त्य संगीत यांच्या फ्यूजनचा ‘यात्रा’ हा आगळा कार्यक्रम घेण्यात आला होता. ‘ऋतुरंग’ महोत्सवाअंतर्गत बिटको महाविद्यालयात हा कार्यक्रम रंगला होता, तर सन 2010-11 मध्ये ‘पाडवा पहाट’ला त्यांच्या संतूरवादनाचा कार्यक्रम ऋतुरंग भवनात झाला होता. शहरात त्यांच्या 8 ते 10 मैफली झाल्या होत्या. याशिवाय सन 1987 मध्ये लोकहितवादी मंडळाच्या ‘एक होती वाघीण’, तर ‘ऋतुरंग’च्या ‘अ‍ॅवॉर्ड’, ‘मिशीतल्या मिशीत’, ‘वाळूचं घर’ या नाटकांना त्यांनी पार्श्‍वसंगीत दिले होते.
दरम्यान, पं. उल्हास बापट हे उत्साही कलावंत होते. त्यांचे नाशिकशी गहिरे ऋणानुबंध होते. त्यांच्या शहरात मोजक्याच मैफली झाल्या, मात्र त्यांनी कानसेनांना तृप्त केल्याची प्रतिक्रिया कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे यांनी दिली.