Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Nashik › पंचवटी, पूर्व भाजपाकडे; मनसेकडे पश्‍चिम

पंचवटी, पूर्व भाजपाकडे; मनसेकडे पश्‍चिम

Published On: Apr 18 2018 12:52AM | Last Updated: Apr 18 2018 12:52AMनाशिक : प्रतिनिधी 

शहरातील सहा प्रभाग समिती सभापतिपदासाठी येत्या 20 व 21 एप्रिलला निवडणूक होणार असून, मंगळवारी (दि.17) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यात पंचवटी व नाशिक पूर्वसाठी भाजपा उमेदवारांचे एकमेव नामांकन झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. तर नाशिक पश्‍चिमसाठी मनसेचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने येथेदेखील बिनविरोध निवडणूक होणार आहे. उर्वरित तीन प्रभाग समिती सभापतिपदासाठी चुरस कायम असून, संख्याबळाचा विचार करता तेथील जागा भाजपा व मनसेच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.

नाशिकरोड सभापतिपदासाठी भाजपाकडून पंडित आवारे तर, शिवसेनेकडून ज्योती खोले यांनी अर्ज दाखल केला आहे. तर, पंचवटीत भाजपाकडून पूनम धनगर यांनी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी संख्याबळ नसल्याने मुख्य विरोधी पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे पंचवटीतून पूनम धनगर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर नाशिक पूर्व प्रभाग समिती सभापतिपदासाठी भाजपाचा सुमन भालेराव यांचा एकट्याचा अर्ज प्राप्त झाल्याने तेथेदेखील निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाजपाचा पारड्यात दोन समिती गेल्या आहेत. नाशिक पश्‍चिम प्रभाग समिती सभापतिपदासाठी मनसेच्या अ‍ॅड.वैशाली भोसले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथे मनसेचा सभापती होणे निश्‍चित आहे. सिडको प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपाने भगवान दोंदे  तर शिवसेनेने हर्षा बडगुजर यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. संख्याबळाचा विचार करता ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. सातपूर प्रभाग समिती सभापतीपदासाठी मनसेकडून योगेश शेवरे यांनी तर, भाजपाकडून रवींद्र धिवरे व व शिवसेनेकडून संतोष गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, भाजपाकडून या जागेवर मनसेला समर्थन देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मनसेच्या शेवरे यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. उर्वरीत तीन प्रभाग समिती सभापतीपतिपदाची निवड ही केवळ औपचारिकता राहिली आहे.

Tags : Nashik, Panchavati, BJP, West, MNS