Wed, May 22, 2019 14:47होमपेज › Nashik › पाच लाख भुजबळ समर्थक मुंबईत धडकणार

पाच लाख भुजबळ समर्थक मुंबईत धडकणार

Published On: Feb 05 2018 2:01AM | Last Updated: Feb 05 2018 12:34AMपंचवटी : वार्ताहर 

माजीमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अधिवेशन काळात मुंबईत पाच लाख समर्थकांचा मोर्चा काढण्याचा निर्धार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. रविवारी (दि.4) समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिक येथील जयशंकर  लॉन्स येथे झाली. बैठकीत हा निर्धार करण्यात आला आहे.
भुजबळाचे सर्व पक्षातील समर्थक असलेल्या आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार तसेच, ज्येष्ठ नेत्यांची राज्यस्तरीय समिती नेमून या समितीच्या बैठकीमध्ये मोर्चाची तारीख जाहीर केली केली जाणार आहे.

तसेच,  मोर्चासाठी समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्‍यांना प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याची जबाबदारी  या बैठकीत देण्यात आली आहे तर विभागीय स्तरासह प्रत्येक जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका घेऊन मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली.  समता परिषदेच्या माध्यमातून दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये नाशिक येथून सुरू झालेले भुजबळ समर्थकजोडो अभियान आणि ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्रम राज्यभर राबविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत निघणारा हा मोर्चा कुठल्याही एका समाजाचा किंवा संघटनेचा मोर्चा नसून यात सर्व जाती धर्माचे, पक्षाचे, सामाजिक संस्थांचे लोक सहभागी होतील अशी माहिती समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी मार्गदर्शन करतांना दिली.

बैठकीत छगन भुजबळ यांच्यावर सध्याच्या व्यवस्थेकडून सूडबुद्धीने कारवाई सुरू असून, यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना माध्यमांसमोर येण्याची वेळ येणे ही बाब व्यवस्थेतील वाईट प्रवृत्तीकडे इशारा करणारेच असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेब कर्डक यांनी मुंबईत होणारा मोर्चा ‘न भूतो न भविष्यती” होईल असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी आ. जयंतराव जाधव, अ‍ॅड.कृष्णा यादव, अ‍ॅड. सुभाष राऊत, प्रशांत शिंदे, सुनील भुसारा,  दशरथ फुले, नवनाथ वाघमारे, डॉ. डी. एन. महाजन, अ‍ॅड.सुभाष मौर्य, संदीप खरात, प्रदीप वैद्य यांची भाषणे झाली. समता परिषदेच्या सर्व पदाधिकार्‍यांना भुजबळ समर्थक योगेश कमोद यांनी शपथ दिली.

यावेळी अनिता देवतकर, अ‍ॅड. बाबूराव बेलसरे, अ‍ॅड. सुभाष राऊत, अंबादास गारुडकर, माजी नगरसेविका वैशाली दाणी, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, मधुकर जेजुरकर, मकरंद सावे, प्रा.जयंत भंडारे, दत्ता खरात, किरण झगडे, प्रीतेश गवळी, दशरथ फुले, डॉ.गणेश खारकर, दत्ता घाडगे, मीनाताई राऊत, गणेश झगडे, संतोष डोमे, मनोज घोडके, एल.एम.पवार, प्रदीप वैद्य, संदीप खरात, देवेंद्र पाटील, दिलीप भुजबळ, नानासाहेब राऊत, आबा खोत, प्रशांत शिंदे, अ‍ॅड. प्रकाश मौर्य, विनय डहाके आदीसह राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.