Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › ‘पंचवटी’ला हिरवा झेंडा दाखविण्याचे स्वप्न अधुरे...

‘पंचवटी’ला हिरवा झेंडा दाखविण्याचे स्वप्न अधुरे...

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:27PMनाशिकरोड : वार्ताहर

पंचवटी एक्स्प्रेसला आदर्श कोचचा दर्जा निर्माण करून देणारे रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी हे  पंचवटी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्याकरिता  रेल्वेस्थानकावर  आले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांना मृत्यूने गाठल्याने रूप बदलेल्या पंचवटी एक्स्प्रेस पाहण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

औपचारिकता पाळली 

बिपीन गांधी यांच्या अकस्मित निधनाने नव्या रुपात धावणार्‍या पंचवटीला जड अंतःकरणाने हिरवा झेंडा दाखवत औपचारिकता पाळण्यात आली.

बापू आता दिसणार नाहीत.. 
प बिपीन गांधी यांना त्यांचे सर्व सहकारी ‘बापू’ या टोपण नावाने आवाज देत असत. रेल्वे प्रवाशांची कोणतीही समस्या असो, बापू वेळ न दवडता मदतीला धावून येत होते. बापू यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना बापू पुन्हा कधीच दिसणार नाहीत. अशी रुखरुख त्यांच्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होती.

गांधी अन् पंचवटी एक्स्प्रेस

बिपीन गांधी आणि पंचवटी एक्स्प्रेस यांचे अतिशय अतूट नाते असल्याचे सर्वश्रुत आहे. पंचवटी वेळेत धावण्याकरिता आणि तिची निगा तसेच स्वच्छता ठेवण्याकरिता गांधी हे सदैव प्रयत्नशील असत. बुधवारी पंचवटीचा लोकार्पण सोहळा होता. तत्पूर्वी गांधी यांनीच मुंबई, दिल्ली येेथे पाठपुरावा करून पंचवटीला नवीन लूक मिळवून दिला. 

अंतिम इच्छा अपूर्ण 

नवीन रंगात धावणार्‍या पंचवटीला हिरवा झेंडा दाखविण्याची गांधी यांची इच्छा होती. मात्र, नियतीने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली नाही. पंचवटीला हिरवा झेंडा दाखविण्याच्या काही मिनिटे अगोदरच काळाने त्यांच्यावर झडप घातली. पंचवटीच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या तसेच रेल्वे प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी तब्बल 30 वर्षे खर्च करणार्‍या गांधी यांनी अखेरचा श्‍वासही रेल्वेस्थानकावर आणि पंचवटीच्या प्रतीक्षेत सोडला.

रुमाल दाखवून देत असत इशारा

बिपीन गांधी हे देवळाली कॅम्प येेथे वास्तव्यास होते. त्यांचे घरदेखील रेल्वे ट्रॅक  शेजारीच होते. मुंबईच्या दिशेने धावणार्‍या पंचवटीमधील प्रवाशांना गांधी रुमाल दाखवून इशारा देत असत.

राज्यराणीसाठी उपोषण

जिल्ह्यामधून मुंबई येेथे रोज अप-डाउन करणार्‍या चाकरमान्यांकरिता पंचवटीला जोडगाडी म्हणून राज्यराणी होती. ती सुरू करून निर्धारित वेळेत धावण्याकरिता बिपीन गांधी यांचे प्रयत्न सर्वांनाच ज्ञात होते. राज्यराणीसाठी गांधी उपोषणालाही बसले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांचा परिपाक म्हणून राज्यराणीमधून प्रवास करण्याची संधी प्रवाशांना आज मिळत आहे.