Thu, Jun 27, 2019 11:43होमपेज › Nashik › पंचवटी जळीत कांडातील संशयित रेल्वेतून फरार

पंचवटी जळीत कांडातील संशयित रेल्वेतून फरार

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 09 2018 11:55PMपंचवटी : वार्ताहर

पंचवटी परिसरातील मायको दवाखाना परिसरात अनैतिक संबंधाच्या वादातून तिघींना पेटवून दिलेल्या प्रियकराने पोलिसांना गुंगारा देत रेल्वेतून उडी मारून पलायन केले. मथुराहून नाशिकला  येत असताना रेल्वेचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत पलायन केले. त्याला पकडण्यासाठी गेलेले सहायक पोलीस निरीक्षक यांनी देखील संशयिताला पकडण्यासाठी रेल्वेतून उडी मारल्याने ते देखील जखमी झाले आहेत.

पंचवटी परिसरातील मायको दवाखान्याजवळ असणार्‍या कालिकानगरमध्ये राहणार्‍या संगीता सुरेश देवरे (38) या महिलेचे जलालोद्दीन खान (55) रा. कानोरीय गाव, जिल्हा मथुरा, याच्याशी अनैतिक संबंध होते. रविवारी (दि. 5) संध्याकाळी झालेल्या वादातून संगीता तिची मुलगी प्रीती आणि नात सिद्धी यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत संशयित आरोपी जलालोद्दीन खान हा फरार झाला होता. या घटनेत तिघींचाही मृत्यू झाला होता. या तिघीना जाळणार्‍या संशयित आरोपीचे नाव, पत्ता आणि फोटो मिळाल्याने पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तातडीने पाऊले उचलून सोमवारी (दि. 6) संध्याकाळी सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे आणि एका पोलीस कर्मचार्‍याला दिल्लीला पाठविले होते.

दिल्ली येथून या टीमने मथुरा गाठून संशयित आरोपी जलालोद्दीन खान याला शिताफीने ताब्यात  घेत मंगळवार (दि. 7) मुरा येथून झेलम एक्स्प्रेसने मनमाडला येण्यासाठी निघाले होते.रात्री नऊच्या सुमारास गंजबासोदा ते विदिशा या रेल्वेस्थानका दरम्यान रेल्वेचा वेग कमी झाल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत जलालोद्दीन खान याने थेट चालत्या रेल्वेतून उडी मारली . त्याला पकडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांनी देखील चालत्या रेल्वेतून उडी मारली. मात्र, तोपर्यंत संशयित फरार झाला होता.