होमपेज › Nashik › याचि देही, याचि डोळा...अनुभवला रिंगण सोहळा

याचि देही, याचि डोळा...अनुभवला रिंगण सोहळा

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:39PM

बुकमार्क करा
त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

रिंगण उभारिले पालखी मार्गावरी, धावती अश्‍व वायू वेगापरी... याचि देही याचि डोळा अनुभवला रिंगण सोहळा असा सुखद क्षण संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त जायखेडा ते त्र्यंबक श्री कृष्णाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी तसेच, परिसरातील भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवला. 

त्र्यंबक-नाशिक रस्त्यावर असलेल्या ब्रह्मा व्हॅली या शैक्षणिक संकुलात  कृष्णाजी महाराजांच्या दिंडीचे रिंगण पार पडले. जायखेडा ते त्र्यंबक श्री कृष्णाजी महाराज यांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यात निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताईच्या नामाच्या गजरात  वारकरी भक्तीरसात चिंब झाले. निवृत्तिनाथांचे रुप पाहण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी अतुरलेल्या वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. ब्रह्मा व्हॅलीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.

दिंड्यांमधील वारकर्‍यांनी दोन्ही बाजूंना उभे राहून अश्‍वांना धावण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ भजन सुरू होते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलऽऽऽ होताच अश्‍व धावू लागले. यानंतर पालखी रथातून खाली घेऊन ती रिंगणाच्या मैदानातून टाळ-मृदंगाच्या निनादात फिरविण्यात आली. पालखीची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर रिंगणाच्या मधोमध असलेल्या कट्ट्यावर पालखी ठेवण्यात आली.  तीन फेर्‍या पूर्ण केल्यानंतर रिंगण सोहळा संपला. पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर  वैष्णवांचा मेळा त्र्यंबकेश्‍वरकडे  मार्गस्थ झाला.