Tue, Jul 16, 2019 10:00होमपेज › Nashik › मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध नाही

मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध नाही

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 28 2018 10:43PM नाशिक : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. एससी, एसटी, ओबीसी घटकांवर अन्याय न होता हे आरक्षण देण्यात यावे. यासाठी कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करण्यात यावी, घटनेत तशी तरतूद करून घेण्यात यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कायदा दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. दोन तृतीयांश बहुमत होण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः सहकार्य करायला तयार आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान आत्महत्या, हिंसाचार यापासून सर्वांनी दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. मागासवर्ग आयोगाचा निकाल आल्यानंतर जर त्यात कायद्याची त्रुटी असेल आणि बदल गरजेचे असतील तर ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आम्ही सर्व त्यास सहकार्य करू, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली.

त्याचबरोबर राज्यातील 72 हजार रिक्तपदांवर जी नोकरभरती करण्यात येणार आहे त्यात मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून एससी, एसटी, ओबीसीसहित सर्व समाजाची नोकरभरती करावी. जेणेकरून इतर समाजावर अन्याय होणार नाही. ही नोकरभरती राज्यातील टाटा सोशल सायन्स सारख्या नि:पक्षपाती यंत्रणेकडून करावी. सध्या मराठा समाजाच्या आंदोलकांचे जे प्रचंड प्रमाणावर अटकसत्र सुरू आहे ते त्वरित थांबवावे, अशी मागणी भुजबळ यांनी यावेळेस केली.