Sat, Nov 17, 2018 04:28होमपेज › Nashik › कुशावर्तात समर्पित करणार सहा राज्यांमधील जल  

कुशावर्तात समर्पित करणार सहा राज्यांमधील जल  

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 11 2018 11:12PMनाशिक : प्रतिनिधी

येथील नमामि गोदा फाउंडेशनतर्फे येत्या शनिवारी (दि.14) त्र्यंबकेश्‍वर व नाशिकमध्ये ‘गोदावरी परिवार’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यावेळी उपस्थित राहणार असून, कुशावर्त गोदावरी पूजनासह अन्य अनेक उपक्रम होणार आहेत. 

दि. 14 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत त्र्यंबकेश्‍वर येथील कुशावर्तात गोदावरी पूजन केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ब्रह्मगिरी येथून गोदावरीच्या पाण्याने भरलेला कलश आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथे नेण्यात आला होता. त्यातील जल पुष्कर घाटावर विधिवत पूजन करून समर्पित करण्यात आले व तेथून आंध्र प्रदेशसह सहा राज्यांतील लोकांनी भरून दिलेले जल त्र्यंबकेश्‍वर येथे आणण्यात आले आहे. त्याचे विधिवत पूजन करून ते कुशावर्तात अर्पण केले जाणार आहे. 

त्र्यंबकेश्‍वरच्या शिवप्रसाद हॉलमध्ये दि. 14 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.पुढे सर्व मान्यवर नाशिक येथे दाखल होणार असून, त्यांच्यामार्फत रामकुंडाची पाहणी व आरती केली जाणार असल्याचे ‘नमामि गोदा’चे अध्यक्ष राजेश पंडित, उपाध्यक्ष चिन्मय उद‍्गीरकर, सचिव धनश्री क्षीरसागर, खजिनदार किरण भालेराव, सदस्य मिलिंद दंडे, डॉ. प्राजक्‍ता बस्ते यांनी कळविले आहे. 

भविष्यातील रणनीती ठरविणार

डॉ. सिंह यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्‍वर नगर परिषद व नमामि गोदा फाउंडेशनतर्फे गोदावरी पुनरुज्जीवन काम सुरू आहे. न्या. अंबादास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या या कामाची पाहणीही दि. 14 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत केली जाणार आहे. त्यानंतर डॉ. राजेंद्र सिंह यांनी विजय परांजपे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सहा राज्यांच्या प्रतिनिधींच्या ‘गोदावरी परिवार’ या संघटनेची भविष्यातील रणनीती ठरविली जाणार आहे.