Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Nashik › अवयवदानाने 7 रुग्णांच्या जीवनात ‘अरुणोदय’

अवयवदानाने 7 रुग्णांच्या जीवनात ‘अरुणोदय’

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 25 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

वेळ दुपारी सव्वाचार वाजेची. गंगापूर रोडवरील ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये बे्रनडेड अरुण तांबोळी (कोठूरकर) यांची एक किडनी आणि यकृत घेऊन रुग्णवाहिका पुण्याकडे निघते. तर दुसरी किडनी, डोळे व त्वचा नाशिकमध्येच दान केले जातात. ग्रीन कॉरिडॉरदरम्यान अवयव घेऊन जाताना तांबोळी कुटुंबीयांच्या एका डोळ्यात अश्रू, तर दुसर्‍या डोळ्यात अवयवदानातून आपल्या जवळच्या व्यक्‍तीच्या स्मृती जिवंत राहणार असल्याचे समाधान दिसत होते. अरुण यांच्या अवयवदानाने सात रुग्णांच्या व नातेवाइकांच्या जीवनात खर्‍या अर्थाने पुन्हा ‘अरुणोदय’ झाला आहे. दरम्यान, यकृत आणि किडनी घेऊन नाशिकमधून निघालेली रुग्णवाहिका सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी पुण्यात पोहोचली.

अंबड लिंक रोडवरील नवनाथनगर येथे राहणारे अरुण तांबोळी यांना रविवारी (दि. 18) सायंकाळी सायकलवरून घराकडे जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेने जखमी झालेल्या अरुण यांना सिडकोमधीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी (दि. 23) सायंकाळच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना बे्रनडेड म्हणून घोषित केले. त्यांच्या नातेवाइकांनी क्षणाचाही विलंब न करता अरुण यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी दुपारी ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दोन्ही किडन्या, यकृत, डोळे व त्वचा दान करण्यात आले. 

अरुण यांचे दान केलेले यकृत पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, तर एक किडनी पुण्यातीलच सह्याद्री रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. तसेच एक किडनी ऋषिकेश हॉस्पिटलमधील रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आली. दरम्यान, डोळे हे नाशिकमधीलच तुलसी ऑय हॉस्पिटलला, तर त्वचा ही वेदांत हॉस्पिटलला दान करण्यात आल्याची माहिती डॉ. संजय रकिबे यांनी दिली. 

मुलगी आणि शालकाचा निर्णय

मयत अरूण तांबोळी हे अंबड येथील एका कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नीदेखील एका कंपनीत आहे. त्यांच्या दोन्ही मुलींचे विवाह झाले असून, त्यांना मुलगादेखील आहे. दरम्यान, वडीलांचा ब्रेनडेडने मृत्यू झाल्यानंतर मोठी मुलगी वर्षा व शालक निवृत्ती गुळवे यांनी क्षणाचाही विलंब न करता अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे सात रूग्णांना जीवदान मिळणार आहे.

..म्हणून घेतला निर्णय

अरूण तांबोळी यांचे कुटुंबीय सामान्य आहे. मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण केले. दरम्यान, गेल्या दीड वर्षात नाशिकमधून झालेल्या ग्रीन कॉरिडॉरची माहिती तांबोळी कुटुंबियांना होती. आपल्याही वडिलांच्या अवयवदानाने दुसर्‍या रूग्णांना जीवदान तर मिळेलच मात्र, त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जीवंत राहतील या उद्देशाने तांबोळी कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.