Tue, Jul 16, 2019 00:09होमपेज › Nashik › मालेगावमध्ये जि. प. मुख्याधिकार्‍यांचा रूद्रावतार

मालेगावमध्ये जि. प. मुख्याधिकार्‍यांचा रूद्रावतार

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 17 2018 11:00PMनाशिक/मालेगाव : प्रतिनिधी 

मालेगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत चालढकल करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. तसेच गरबड येथील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जी करणार्‍या ग्रामसेवकाला पाठीशी घालणार्‍या विस्तार अधिकार्‍यावरच कारवाई करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. असमाधानकारक कामकाज पाहून संतापलेल्या गिते यांनी चक्‍क सत्कारच परत केला.

पाणीपुरवठा योजना व पाणी गुणवत्ता कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त करून कर्तव्यात कसूर करणार्‍या आरोग्य तसेच ग्रामपंचायत विभागातील कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. तसेच ग्रामीण भागातील कुपोषित बालकांवर उपचारासाठी बालविकास प्रकल्पांतर्गत सीटीसी केंद्राची स्थापन केली आहे. तालुकास्तरीय या केंद्रांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

पाणीपुरवठा, घरकुल, पाणी गुणवत्ता, स्वच्छ भारत अभियान या विषयांचा आढावा सुरू असताना कोणत्याही कामात प्रगती नसल्याचे व संबंधित अधिकारी व कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याने डॉ. गिते संतप्त झाले. ज्या तालुक्यात समाधानकारक काम नाही त्या तालुक्यात सत्कार स्वीकारणार नाही, असे सांगत व्यासपीठावरून उठत गिते यांनी पुष्पगुच्छ गटविकास अधिकार्‍यांच्या हाती सुपूर्द केला. तालुक्यातील 124 ग्रामपंचायतींपैकी 29 ग्रामपंचायतींनी टीसीएल तपासणीसाठी नमुने पाठवले नसल्याचे पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले. याबाबत  संबंधितांची आठ  दिवसांत चौकशी करून जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश गिते यांनी दिले.

गरबड ग्रामपंचायतीला सांडपाणी व घनकचरा प्रकल्पासाठी निधी देण्यात आला होता; पण याबाबत नोटिसा देऊनही ग्रामपंचायत विभागाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येत नसल्याची बाब बैठकीत उघड झाली. याबाबत विस्तार अधिकारी महाले यांना माहिती विचारली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही तसेच ग्रामसेवकावर देखील विहित वेळेत कोणतीही कारवाई केली नाही. गिते यांनी गटविकास अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित ग्रामसेवक व विस्तार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे सांगितले. शौचालय फोटो अपलोड करण्याबाबत मालेगाव तालुका सर्वात मागे असून, जिल्ह्यात सर्वात जास्त उद्दिष्ट मालेगाव तालुक्याचे आहे. येत्या 23 मेपर्यंत सर्व फोटो अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले.

ग्रामविकास आराखड्यातील अंगणवाडी कामांबाबत आढावा सुरू असताना पळसदरे ग्रामपंचायतीने तब्बल एक लाख 20 हजार रुपये शौचालय बांधकामावर खर्च केल्याचे निदर्शनास आले. तसेच याबाबतचे अंदाजपत्रक शाखा अभियंत्याने तयार करणे आवश्यक असताना उपअभियंत्याने सदरचे अंदाजपत्रक तयार केल्याची बाब समोर आली. याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन डॉ. गिते यांना दिले. पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई करणार्‍या तांत्रिक सेवा सल्लागारांची चौकशी करण्याचे आदेशही डॉ. गिते यांनी कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांना दिले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला. सर्व ग्रामसेवकाचा जागेवर जाऊन आढावा घेण्यात आला. 30 जूनपर्यंत घरकुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले. बैठकीस उपस्थित नसणार्‍या रोजगार हमी योजनाच्या कंत्राटी पद्धतीने कार्यरत सहायक कार्यक्रम अधिकारी मयूर पाटील यांची सेवा तत्काळ समाप्त करण्याचे आदेश डॉ. गिते यांनी बीडीओंना दिले.