होमपेज › Nashik › काझीगढीबाबत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश

काझीगढीबाबत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 15 2018 11:58PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकसह राज्यात यंदा पावसाचे आगमन वेळेवर होणार असून, पाऊस यंदा चांगला असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गोदा काठावरील काझीगढीला भूस्खलनचा धोका आहे. येथील वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या सुरक्षितेताच प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील दोनशे कुटुंबांचे पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करून त्याचा अहवाल सादर करावा, असे पत्र जिल्हा प्रशासनाने मनपाला दिले आहे. 

जुन्या नाशिकमधील गोदा घाटाला लागून असलेल्या काझीगढी परिसरात दोनशे कुटुंब वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांपासून या गढीचा भाग वारंवार कोसळत आहे. परिणामी, पावसाळ्यात या गढीच्या भागात वास्तव्यास असलेल्या दोनशे कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्‍न कळीचा मुद्दा ठरतो. दरम्यान, महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच गढी खाली करण्याच्या नोटिसा नागरिकांना बजावते. परंतु, नागरिकांकडून या नोटिसांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनही हतबल आहे.   गेल्या वर्षी पावसाळ्यात काझीगढीचा काही भाग कोसळला होता. या घटनेत सुमारे वीस जण जखमी झाले होते. दरम्यान, गढीवरील रहिवाशांकडून कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली जात आहे.

मात्र, आजही ही मागणी झालेली नाही. परिणामी, जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मनपाशी पत्रव्यवहार केला आहे. पत्रात गत घटनांची आधार घेत गढीवरील रहिवाशांचे पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच याबाबत काय कारवाई केली याचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाने मनपाला दिले आहेत.