Thu, Aug 22, 2019 12:55होमपेज › Nashik › सिन्‍नरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी निवडीला विरोध

सिन्‍नरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी निवडीला विरोध

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:20PMसिन्‍नर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिन्‍नर तालुकाध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, शहराध्यक्षपदी नामदेव कोतवाल, तर सिन्‍नर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी कैलास झगडे यांची निवड करण्यात आली. पक्ष निरीक्षक नामदेव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र, मावळते तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड यांनी या निवडीला जोरदार विरोध करत बैठकीतून काढता पाय घेतला.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्षपदासाठी 14, शहराध्यक्षपदासाठी सात, तर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदासाठी सहा कार्यकर्त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे निवडीचा पेच वाढला. पक्षनिरीक्षक नामदेव वाकचौरे यांच्यासह माजी मंत्री दिघोळे, कोंडाजीमामा आव्हाड, डॉ. विष्णू अत्रे, डी. डी. गोर्डे, शांताराम ढोकणे आदी सहा जणांची समिती कार्यकारिणी निवडीसाठी तयार करण्यात आली. समिती घेईल तो निर्णय मान्य असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाली.

बैठकीत निवड समितीने निर्णय जाहीर केला. त्यात तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष यांच्यासह राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, कोंडाजी आव्हाड, डॉ. विष्णू अत्रे, शांताराम ढोकणे अशा सहा जणांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदासाठी डॉ. संदीप लोंढे यांच्या नावाची शिफारस करून जिल्हा कार्यकारिणीकडे पाठविण्यात आले. तालुकाध्यक्षपदी रतन तुपे, तर शहर उपाध्यक्षपदी पवन जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. भाऊसाहेब पवार यांनी आभार मानले.

यावेळी बाळू पाटील आव्हाड, राजेंद्र भगत, निवृत्ती पवार, दीपक लहामगे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मेघा दराडे, भाऊसाहेब पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले.

मुरकुटे, काकड यांचा त्रागा

तालुकाध्यक्षपदासाठी बाळासाहेब वाघ, तर शहराध्यक्षपदावर नामदेव कोतवाल यांचे नाव जाहीर करताच, मावळते तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, मावळते शहराध्यक्ष रवींद्र काकड यांनी या दोन्ही नावांना विरोध दर्शविला. जिल्हा पदाधिकार्‍यांना संपर्क साधून तातडीने त्यांच्याकडे तक्रारवजा माहिती देण्यात आली. याच दरम्यान, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांचाही पक्ष निरीक्षकांना फोन आल्याचे समजते. मुरकुटे व काकड यांनी आम्ही पक्षबांधणी केली. ऐनवेळी पक्षात आलेल्या लोकांना पदे दिली जातात, असे सांगून या निवडीला जिल्हा पातळीवरून स्थगिती आणणार असल्याचे सांगत त्रागा केला. इच्छुकांची संख्या जास्त होती तर निवडणूक घेण्याची मागणी आम्ही केली होती. काही लोक जाहीरपणे आम्ही कधीही एकाच पक्षात राहत नाही असे सांगतात, अशा लोकांना पदे देण्याचा अट्टहास कशासाठी आहे, हे कळत नाही, असेही ते म्हणाले.