Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Nashik › जलसमाधी आंदोलनाचा फियास्को 

जलसमाधी आंदोलनाचा फियास्को 

Published On: Jan 25 2018 1:49AM | Last Updated: Jan 25 2018 1:44AMनाशिक : प्रतिनिधी 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.24) गंगापूर धरणात जलसमाधी घेण्यासाठी गेलेल्या करणी सेनेच्या आंदोलनाचा फियास्को झाला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे करणी सेनेच्या पदाधिकार्‍यांना आंदोलनच करता आले नाही. जलसमाधीसाठी हट्टाला पेटलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी दिग्दर्शक भन्साळी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. भाजपा व मनसेच्या भूमिकेविरुद्धही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

‘पद्मावत’ या चित्रपटाला करणी सेनेकडून देशभरात विरोध होत आहे. नाशिकमध्येही करणी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी चित्रपटाला विरोध करण्यासाठी गंगापूर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यास हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला होता. बुधवारी सकाळपासून करणी सेनेचे पदाधिकारी गंगापूर धरण परिसरात पोहोचत होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी ग्रामीण पोलिसांनीही धरणाच्या प्रवेशद्वारावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

सोबत राखीव दलाची एक तुकडी मदतीला होती.आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जलसमाधी आंदोलन करण्यापासून परावृत्त केले. परवानगी नाकारल्यामुळे करणी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत ‘भन्साळी मुर्दाबाद’, पद्मावत प्रदर्शित होऊ देणार नाही, मातेचा अपमान सहन करणार नाही, अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धही रोष व्यक्त करण्यात आला. तहसीलदार राजश्री अहिरराव व पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिल्याशिवाय जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला. 

जलसमाधी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने पोलीस व करणी सेना यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळेनंतर त्यांची सुटका करण्यात आली. यामुळे गंगापूर धरण परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, जिल्हाभरातून गंगापूर धरणाच्या दिशेने येणार्‍या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची वाहने पोलिसांनी जागोजागी अडविल्यामुळे हे आंदोलक सहभागी होऊ शकले नाही.