Sun, May 26, 2019 11:26होमपेज › Nashik › भिडे गुरुजींच्या सभेला विरोध

भिडे गुरुजींच्या सभेला विरोध

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 09 2018 11:19PMनाशिक : प्रतिनिधी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापन संकल्प पूर्तता आवाहन आणि खडा पहारानिमित्त संभाजी भिडे गुरुजी यांच्या धर्मसभेचे आयोजन रविवारी (दि.10) रविवार कारंजा येथील वडांगळीकर महाराज मठात करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सभेवर पोलिसांसह सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे पोलिसांनी विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संभाजी भिडे गुरुजी यांच्या धर्मसभेचे आयोजन रविवारी (दि.10) रविवार कारंजा येथील वडांगळीकर महाराज मठात करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सभेवर पोलिसांसह सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. 

भिडे गुरुजी राज्यभरात ठिकठिकाणी धर्मसभा घेत सुवर्ण सिंहासनासाठी निधी गोळा करीत आहेत. त्यानुसार रविवारी सायंकाळी 5.30 वाजता वडांगळीकर महाराज मठात भिडे गुरुजी यांची सभा होणार आहे. सभेला होणारा विरोध पाहता स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पातळीवर संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांना विरोध कमी केला जात आहे. तसेच भिडे गुरुजी यांच्या भाषणात आक्षेपार्ह काही राहणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हींसह सभेवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी (दि.9) सायंकाळच्या सुमारास पोलीस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. राजू भुजबळ यांनी सभास्थळाची पाहणी केली. सभेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचप्रमाणे जमावबंदी, शस्त्रबंदी, घोषणाबंदीचे आदेश दिले आहेत.

जमावबंदीचे आदेश

सभेच्या पार्श्‍वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी 15 जूनपर्यर्ंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. कोणतेही दाहक, स्फोटक पदार्थांसह दगड, शस्त्र, इतर हत्यारे बाळगण्यास देखील पोलिसांनी बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्‍तींच्या  चित्र, प्रतिकात्मक प्रेत, प्रतिमांचे प्रदर्शन व दहन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. घोषणाबाजी, वाद्य वाजवण्यासह, आवेशपूर्ण भाषण करणे, अविर्भाव करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात असे कोणतेही कृत्य करणार्‍या व्यक्‍तींवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. 

सोशल मीडियावर वॉच

सभेला होणारा विरोध पाहता पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष केंद्रित केले आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आक्षेपार्ह किंवा भडक विधाने, प्रतिक्रिया करणार्‍यांवर पोलिसांनी लक्ष ठेेवले असून, काही नागरिकांना समज दिल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले.